बेस्टला 2,100 कोटी रुपयांचा तोटा

0

मुंबई: मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी बेस्ट परिवहन सेवा सध्या आर्थिक डबघाईला आली आहे. त्यासाठी अनेक चुकीचे निर्णय कारणीभूत आहेत. बेस्टला सध्या 2 हजार 100 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने या वर्षात एप्रिल महिन्यापासून एकदाही 40 हजारांहून अधिक कामगारांना एकदम वेतन दिले नाही. कामगारांचे वेतन देण्यासाठीदेखील बेस्टकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही.

आर्थिक तोट्याची जबाबदारी मनपाने स्वीकारावी
बेस्टला आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी बेस्ट कामगार संघटना करत आहेत. त्यासाठी महापालिकेने बेस्ट परिवहन सेेवेकडे आरोग्य, शिक्षण सेवेप्रमाणे कर्तव्यबुद्धीने पहावे. तसचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी 2 हजार कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे.

बेस्टला आर्थिक नुकसान होण्यामागील कारणे
बेस्ट प्रशासनाने 288 वातानुकूलीत महागड्या बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांना आकर्षित करण्याचा यामागे उद्देश होता. मात्र या बसगाड्या लागलीच नादुरुस्त होऊ लागल्या. त्यांच्या देखभालीचा खर्च वाढत जाऊ लागला. त्यामुळे वर्षाला 80 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान बेस्ट प्रशासनाला झाले.
2008 साली बेस्टने विशेष डिझाईन केलेल्या बसगाड्या खरेदी केल्या होत्या. ज्यात एलईडी बोर्ड, स्टाईलीश आसने होती. मात्र काही दिवसांनी या बसगाड्यांचीही दूरवस्था झाली. एलइडी बोर्ड नादुरस्त झाले. आसने तुटली. त्यामुळे 2008-09 या वर्षात बेस्टकडे 43 लाख प्रवासी संख्या होती, ती 2015-16 मध्ये 30 लाखापर्यंत घसरली.
बेस्ट प्रशासनाने काही बसमार्ग राजकीय दबावामुळे सुरू केले. त्यात अधिक नुकसान सहन करावे लागले. प्रशासन व्यवस्थेतील त्रुटींमुळेही बेस्टला नुकसान झाले.