बेस्ट ऑफ लक : आजपासून 12 वीची परीक्षा
गैरप्रकाराच्या प्रतिबंधासाठी 252 भरारी पथके गठीत
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज, दि. 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येते. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत परीक्षा होणार असून, राज्यभरातून 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यामध्ये 8 लाख 34 हजार 134 विद्यार्थी तर 6 लाख 50 हजार 818 विद्यार्थिनी आहेत. राज्यभरात 2 हजार 22 परीक्षा केंद्र आहेत. गेल्या वर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअॅपवर फिरणार्या प्रश्नपत्रिकेमुळे यंदा विशेष खबरदारी घेत वर्गातच 10 वाजून 50 मिनिटाला प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यात येणार आहे. बुधवारी 11 ते 2 या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन समुपदेशन
यंदा ही परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणार आहे. परीक्षार्थ्यांचा मानसिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने बहुतांश पेपरदरम्यान खंड ठेऊन या परीक्षेच वेळापत्रक तयार करण्यात आले असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले. परीक्षा काळात विद्यार्थी परीक्षेच्या अनाठायी भीतीने ग्रासलेले असतात. अनेक विद्यार्थी परीक्षेच्या भीतीने नकारात्मक विचारांच्या दडपणात वावरत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या समुपदेशानाकरिता राज्य मंडळाने उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी 10 समुपदेशाकांची निवड करण्यात आली असून, ते विद्यार्थ्यांना ऑनलाईन समुपदेशन करणार आहेत. परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी 252 भरारी पथके नेमण्यात आल्याची माहिती अध्यक्षांनी दिली.
काळजी नका करू, यांच्याशी संपर्क साधा
परीक्षेच्या बदलेल्या स्वरूपामुळे नापास होणार्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी झाली आहे, त्यामुळे तुम्ही नापास होऊच शकत नाही, असा विद्यार्थ्यांना धीर देण्याचे काम समुपदेशकांकडून केले जाते आहे. पुणे विभागीय मंडळाकडून रमेश पाटील (पुणे) 9822334101, एस. एल. कानडे (नगर) 9028027353, पी. एस. तोरणे (सोलापूर) 9960002957 या समुपदेशकांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षेबाबतच्या कुठल्याही समस्येबाबत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थी त्यांना फोन करू शकतील, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षेच्या काळात अशी घ्या काळजी!
-कमीत कमी 7 ते 8 तास झोप घ्या.
-अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. जेवण, झोप व अभ्यासाच्या वेळा ठरवा.
-परीक्षेच्या काळात शक्यतो मोबाइल फोन बंद ठेवा
-वर्षभरात काढलेल्या नोट्सच्या अभ्यासावर भर द्या.
-अखंड अभ्यास करण्यापेक्षा, मधेमधे छोटे ब्रेक, विश्रांती घ्या.
-आवडीच्या विषयाने अभ्यासाची सुरुवात करा.
-गरज वाटत असल्यास, मोठ्यांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.
-प्रत्येक दिवशी स्वत:च्या सोयीनुसार व आवडीनुसार सर्वच विषयांना थोडा-थोडा वेळ द्यावा.