मुंबई – बेस्ट कामगारांच्या उपोषणाची दखल घेतली न गेल्यामुळे अखेर आज कृती समितीने ६ ऑगस्ट रात्री १२ वाजल्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी साखळी उपोषण मागे घेण्यात आल्याचे जाहीर करतानाच आता निर्णायक लढा सुरू झाल्याचे कृती समितीने जाहीर केले.
‘बेस्ट’ उपक्रम हा पालिकेचाच उपक्रम असला तरी आयुक्तांकडून मात्र या उपक्रमाला कोणतेही आर्थिक सहाय्य मिळत नाही. त्यामुळे ‘बेस्ट’ कर्मचार्यांचे पगार होण्यास विलंब लागत आहे.या पार्श्वभूमीवर अनेक वेळा मागणी करूनही पालिका आयुक्त ‘बेस्ट’ला आर्थिक सहाय्य करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगारांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संयुक्त कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत तातडीने निर्णय घ्या अन्यथा ६ ऑगस्ट मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आज महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, आमदार सुनील शिंदे, अजय चौधरी, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
‘बेस्ट’च्या वडाळा डेपोसमोर १ ऑगस्टपासून संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली ‘बेस्ट’ कर्मचारी, संघटनांच्या प्रतिनिधींचे आंदोलन सुरू आहे. मात्र पालिका प्रशासनाने या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चादेखील केली नाही. पालिका प्रशासनाची अशी मुजोरी सुरू असताना आंदोलनकर्त्यांची प्रकृती मात्र खालावत गेली. या पार्श्वभूमीवर उपोषण आंदोलन मागे घेऊन ६ ऑगस्ट मध्यरात्रीपासून सर्व कर्मचार्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
– सुहास सामंत, ‘बेस्ट’ कामगार सेना, कृती समिती
पालिका प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास होणार्या संपामध्ये ‘बेस्ट’ कर्मचार्यांच्या बेमुदत संपामध्ये बेस्ट कामगार सेना, बेस्ट वर्कस युनियन, बेस्ट कामगार संघटना, भाजप बेस्ट कामगार संघ, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट एम्प्लॉइज युनियन, बेस्ट परिवहन कर्मचारी संघ, बेस्ट जागृत कामगार संघटनांसह अनेक संघटना सहभागी होणार आहेत.
अशा आहेत मागण्या
– बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दुसर्या दिवशी करावा
– बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा
– महापालिकेने बेस्टला दिलेले कर्ज अनुदान जाहीर करावे
– पालिका आकारत असलेल्या विविध करातून सूट मिळावी
– बेस्ट उपक्रमाची सर्व जबाबदारी पालिकेने घ्यावी
कृती समितीने संप करण्यासाठी घेतलेल्या मतदानात ९७ टक्के कौल मिळाला. तरीही संप न करता सदनशीर मार्गाने साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. मात्र शासकीय यंत्रणांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे कामगारांच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्यामुळेच कामगार-कार्यकर्त्यांच्या सभेत झालेल्या निर्णयानुसार ६ ऑगस्टपर्यंत प्रश्न सुटला नाही तर बेमुदत संप करण्यात येईल.
– शशांक राव, बेस्ट वर्कर्स युनियन, कृती समिती