मुंबई : मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कामगारांनाही पंधरा हजार रुपये बोनस मिळावा या मागणीसाठी उद्यापासून मुंबई इलेक्ट्रिकल वर्कर्स युनियनने बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. वडाळा आगरासमोर गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून या आंदोलनास सुरुवात होईल अशी माहिती युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिली.
गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बेस्ट समितीच्या सभेमध्ये उचल रक्कम ऐवजी बेस्ट कामगारांना पंधरा हजार रुपये बोनस जाहीर करण्यात यावा. जोपर्यंत कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. यासंदर्भातील निवेदन बेस्टचे महाव्यवस्थापक, बेस्ट समितीचे चेअरमन आणि बेस्ट समिती सदस्यांना दिल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.