बैलगाडीला अज्ञात वाहनाची धडक; सात जण जखमी

0

जळगाव । बैलगाडीतून शेतशिवारात जात असताना भरधाव वेगात येत असलेल्या वाहनाने धडक दिल्याने या अपघातात 7 जण जखमी झालेत. ही घटना रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नांदेड (धरणगाव) जवळ घडली. वाहनाच्या धडकेत बैलगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बैल जखमी झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना चोपडा ग्रामीण रूग्णालयात हलविले.

मशागतीच्या कामासाठी मजूर जात होते बैलगाडीतून
पावसाची चिन्हे दिसू लागल्याने शेती मशागतीच्या कामांना गती मिळाली असून रविवारी सकाळी नांदेड येथून 7 जण बैलगाडीत बसून शेतात कामाला निघालेले होते. बैलगाडी चोपडा धरणगाव महामार्गावरून जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने बैलगाडीला धडक दिली. यात 7 जणांना दुखापत झाली. सातपैकी अत्यवस्थ तीन जणांवर चोपडा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिकच्या उपचारार्थ त्यांची जिल्हा शासकीय रूग्णालयात सोमवारी रवानगी करण्यात आली. जखमींमध्ये सपना रामदास कोळी (17), भास्कर रमेश कोळी (20) जयश्री पंडित सोनवणे (17) सर्व राऩांदेड यांचा समावेश असून अन्य चौघे चोपडा रूग्णालयात उपचार घेत आहेत.

बैलांनाही दुखापत
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बैलगाडीला जुंपलेले दोन बैल जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. बैलगाडीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रस्त्याच्या बाजुला केले. नंतर रूग्णवाहिकेतून जखमींना तत्काळ चोपडा येथे हलविण्यात आले.

फिनाईल घेतल्याने वृध्द अत्यवस्थ
जळगाव : फिनाईल घेतल्याने वृध्दास विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना उपचारार्थ जिल्हाशासकिय रूग्णालयात हलविले. लोटू महाजन (58) देऊलवाडी (जळगाव) असे बाधीत रूग्णाचे नाव आहे. कुटुंबातील सदस्य कामानिमीत्त घराबाहेर असताना एकटे असताना लोटू महाजन यांनी फिनाईल घेतले. घटना लक्षात आल्यावर 108 क्रमांकाची रूग्णवाहिका बोलवून जखमीस सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. वृध्दावर उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, प्रौढाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.