भुसावळ। राज्य सरकार हे शेतकरी विरोधी धोरण राबवित असून यामुळे राज्यातील शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. यामुळे राज्यभरात शेतकर्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने कर्जमाफीसह शेतकर्यांचा सातबारा उतारा कोरा करण्यात यावा तसेच शेतमालास हमीभाव मिळवून देण्यात यावा, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवार 1 जून रोजी जामनेर रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून ते प्रांत कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकर्यांनी शासनाविरोधी घोषणा दिल्याने संपुर्ण परिसर दणाणून निघाला. मोर्चा नंतर प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा निषेध
राज्यभरात शासनाने तुर खरेदीला ब्रेक लावल्यामुळे असंख्य शेतकर्यांची तुर घरातच पडून आहे. त्यामुळे शेतकर्यांना पिकांच्या लागवडीसाठी लागलेला खर्च, मजुरी ही सुध्दा यातून निघेनाशी झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकर्यांच्या विरोधात बोलणार्या रावसाहेब दानवे यांचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सुचनाही केल्या.
पिकांना योग्य भाव द्यावा
शेतकरीहितासाठी कोणतीही योजना न राबविता केवळ पोकळ आश्वासने सरकारतर्फे दिले जात आहे. त्यामुळे शेती क्षेत्रदेखील संकटात सापडले आहे. यासाठी शासनाने भरीव उपाययोजना करण्याची आवश्यकता असून शेतकर्यांच्या पिकांना योग्य भाव मिळाल्यास यातून त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करणे सहज शक्य होईल. त्यामुळे शासनाने दखल घेण्याची मागणी केली आहे.
या आहेत मागण्या
शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतकर्यांचे विज बिल माफ करावे, ज्या शेतकर्यांनी डिमांड नोट भरली आहे त्यांना त्वरीत विज वितरण कंपनीतर्फे विज कनेक्शन देण्यात यावेे, भुसावळ एमआयडीसीचा विकास करावा, रेल्वेच्या तिसर्या व चौथ्या मार्गासाठी संपादीत करण्यात आलेल्या शेतकर्यांच्या जमिनीला तात्काळ मोबदला देण्यात यावा आणि त्यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस रेल्वेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, स्वस्त दरात बि- बियाणे व खते शेतकर्यांना द्यावे, कुर्हा- बोदवड शिवारातील वन्य प्राण्यांपासून शेताताील पिकांसाठी संरक्षण मिळावे या मागण्यांचा
समावेश आहे.
मोर्चात यांचा होता सहभाग
राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी मोर्चात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष योगेश देसले, जिल्हा परिषद उपगटनेता तथा तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, आय.टी. सेल जिल्हाध्यक्ष संदीप पवार, महिला जिल्हाध्यक्षा विजय पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य पोपटराव पाटील, युवक शहराध्यक्ष पवन मेहरा, विधानसभा क्षेत्रप्रमुख धोंडू भोई, दिपक मराठे, रविंद्र सोनवणे, प्रल्हाद बोरसे, राजेंद्र पाटील, किशोर खोडपे, रावेर तालुका युवक अध्यक्ष दीपक पाटील, आबा पाटील, मानमुडी सरपंच सतीष पाटील, महेंद्र पाटील, कैलास महाजन, रावेर तालुकाध्यक्ष सोपान पाटील, साकेगाव उपसरपंच शकील पटेल, विजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संतोष भोळे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, प्रविण गुंजाळ, गोकुळ वाघ, सुकदेव बावस्कर, डॉ. दीपक पाटील, अश्विनी पाटील, ज्ञानेश्वर कोळी आदी सहभागी झाले होते.