बॉम्बे हॉस्पिटलजवळच्या रस्त्याचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात

0

मुंबई । दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध ’बॉम्बे हॉस्पिटल’ लगतच्या सर्व रस्त्यांवर एकेरी वाहतूक असल्यामुळे या रुग्णालयात येणा-या रुग्णांना वा रुग्णवाहिकांना अनेकवेळा चर्चगेट पर्यंत फेरा घालून यावे लागत असे, ज्यामुळे अनेकदा त्यांची गैरसोय होत असे. हे लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनानुसार आता या’बॉम्बे हॉस्पिटल लेन’चे रुंदीकरण करण्यात येत आहे. ज्यामुळे सध्या 12.30 मीटर रुंदी असणार्‍या या रस्त्याची रुंदी आता 21.34 मीटर एवढी होणार आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी दुकाने यापूर्वीच स्थानांतरीत करण्यात आली आहेत, तर रस्त्याच्या एका बाजूला असणारी व रुंदीकरणात येणा-या विहिरीवर देखील ’स्लॅब’ टाकून ती झाकण्यात येणार आहे. तथापि, विहिरीतून पाणी काढण्यासाठी झाकणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या महिन्यात पूर्ण होऊन या रस्त्यावरून दुतर्फा वाहतूक सुरू होईल, अशी माहिती ’ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

रस्त्याच्या रुंदीकरण करण्याच्या कार्यवाहीने आता वेग घेतला आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या आड येऊ शकणारी 6 दुकाने यापूर्वीच हलवण्यात आली आहे तसेच या रस्त्याच्या एका बाजूला असणारी व रुंदीकरणाच्या आड येऊ शकणा-या विहिरीवरदेखील ’स्लॅब’ टाकून ती झाकण्यात येणार आहे. तथापि, विहिरीतून पाणी घेता यावे, यासाठी विहिरीच्या एका बाजूला झाकण असणार आहे. ज्यामुळे विहिरीतील पाण्याचा वापर करता येणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ आणि रस्त्याच्या मधोमध दुभाजकदेखील बांधण्यात येणार आहे.या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुढील महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक सुरु होऊ शकेल. या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक सुरू झाल्यानंतर ’क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके’ चौकातून (मेट्रो चौक) महात्मा गांधी मार्गावरून उजवे वळण घेऊन ’बॉम्बे हॉस्पिटल लेन’या मार्गाने थेट ’बॉम्बे हॉस्पिटल’मध्ये येणे शक्य होणार आहे. ज्यामुळे रुग्णवाहिकांचा चर्चगेटपर्यंतचा फेरा वाचणार आहे.