बोंड अळीच्या अनुदानासाठी आमदारांना साकडे

0

साकरी शिवारातील 130 शेतकरी अनुदानापासून वंचित

भुसावळ- गतवर्षी बोंडअळीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने अनुदान स्वरूपात मदत जाहीर केली मात्र या मदतीपासून तालुक्यातील साकरी येथील किमान 130 शेतकरी वंचित राहिल्याने त्यांनी शुक्रवारी अनुदानासाठी आमदार संजय सावकारे यांना साकडे घातले.

जिरायत व बागायत शेतकरी अनुदानापासून वंचित
तालुक्यातील साकरी शिवारातील किमान 600 शेतकर्‍यांना मागील वर्षी झालेल्या बोंडअळीमुळे नुकसान सहन करावे लागले. यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान स्वरूपात मदत जाहीर केली असून अनुदानाचे वितरण सुरू केले आहे मात्र या भागातील 130 शेतकर्‍यांनी नियमानुसार सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही त्यांच्या बँकेतील खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. यामध्ये जिरायत 60 तर बागायतदार 70 शेतकर्‍यांचा समावेश आहे. यामुळे शुक्रवारी अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांनी आमदार संजय सावकारे यांची भेट घेवून आपली व्यथा व्यक्त केली. त्यानुसार आमदारांनी प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शेतकरी अनुदानापासून का वंचीत राहिले ? अशी विचारणा करत शेतकर्‍यांच्या अनुदानाची समस्या त्वरीत मार्गी लावण्याची सुचना दिली. यामुळे शेतकर्‍यांच्या अनुदानासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दोन वर्षापासून तलाठ्याची हुलकावणी
साकरी व खडका या दोन गावांसाठी तलाठी वकील कुंवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र कुंवर यांचे मुख्य कार्यालय साकरी येथे असलेतरी ते या गावातील शेतकर्‍यांना हुलकावणी देत खडका गावातूनच कारभार सांभाळत आहेत. यामुळे तलाठी यांचे विरूद्धही शेतकर्‍यांनी आमदार संजय सावकारे यांच्याकडे तक्रार केली.

छायाकिंत प्रत जमा करण्याची सुचना
आमदार संजय सावकारे यांची भेट घेतल्यानंतर भाजपा तालुका सरचिटणीस नारायण कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भारंबे, संजय चौधरी, संजय तायडे, नरेंद्र पाचपांडे, विजय भारंबे, मनिष नेहते, मुकुंदा फालक, पंकज फालक, हेमंत नेहते यांच्यासह शेतकर्‍यांनी तहसील कार्यालय गाठले. यावेळी प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयात बँकेच्या पासबुकची छायाकित प्रत जमा करावे, असे सांगितले.