जळगाव । जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया मे, जुन महिन्यात राबविली जाते. त्याअनुषंगाने यावर्षीची बदली प्रक्रिया मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु करण्यात आली. सोमवारी 22 मे पासून बदलीस सुरुवात झाली आहे. बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र जिल्हा परिषदेच्या सेवा ज्येष्ठतेनुसार केलेल्या केंद्र प्रमुखांच्या यादीत निम्या पैक्षा जास्त केंद्र प्रमुखांनी बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करुन बदलीचा लाभ घेतला असल्याची यादीवरुन दिसून आले आहे. 22 पैकी 13 केंद्रप्रमुखांनी अपंग असल्याचे प्रमाणपत्र सादर केले असून त्याद्वारे सोईच्या ठिकाणी बदली करुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.
खरे अपंग लाभापासून वंचित
शासकीय सेवेत असलेल्या कर्मचार्यास अपंग असल्यास विविध शासकीय लाभ देण्यात येत असते. नोकरी करत असतांना त्यांना विशेष दर्जाच्या लाभ देण्यात येत असतो. मात्र बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करुन अपंग नसलेले देखील अपंगाना लागु असलेल्या सुविधांचा लाभाचा फायदा घेत आहे. त्यामुळे खरे अपंग लाभार्थी हे लाभा पासून वंचीत असल्याची तक्रार आहे. या सदंर्भात प्रशासनाने बोगस अपंगाचा शोध घेऊन कारवाईची मागणी केल आहे.
धुळे येथून पडताळणी
नवनियुक्त जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पदभार स्विकारताच बोगस अपंग प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतले जात असल्याने अपंग कर्मचार्यांनी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अपंग प्रमाणपत्र पडताळणी सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बोगस प्रमाणपत्र आढळुन आल्यास संबंधीत कर्मचार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी
शासनाने 26 फेबु्रवारी शिक्षक बदली संदर्भात नविन परिपत्रक जारी केले आहे. नवीन परिपत्रकातील अटी शर्ती नुसार या वर्षी बदली करण्यात येणार आहे. अवघड व सोपे क्षेत्र निहाय सर्वेक्षण करण्यात आले असून त्याआधारेच बदली होणार आहे. बदली थांबवणे, सोईच्या ठिकाणी बदल्या करून घेण्यासाठी शासकीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस अपंग प्रमाणपत्र, अस्थिव्यंग प्रमाणपत्राचा धडाका सुरू आहे. शिक्षक बदल्यांमुळे हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर सादर केले जाते.