मुक्ताईनगर। जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार तहसिलदार अध्यक्ष असलेल्या त्रिसदस्यीय समितीने 15 एप्रिलपर्यंत तालुक्यातील 88 पैकी 80 दवाखाने तपासून तसेच डॉक्टरांची कागदपत्रे पडताळणी करुन अहवाल नोंदविला आहे. यात मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील चिंचोल, कुर्हा, निमखेडी बु. येथील काही दवाखाने कुलूप बंद असल्याचे पथकाला आढळले.
डॉक्टरांकडून घेण्यात आली लेखी स्वरुपात नोंद
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार बोगस डॉक्टरांना चाप लावण्यासाठी तहसिलदार जितेंद्र कुवर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील, पोलीस निरीक्षक अशोक कडलग, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. नम्रता अच्छा यांचे पथक नेमण्यात आले आहे. या पथकाने तालुक्यातील 80 दवाखान्यांची तपासणी केली. त्यात दवाखान्यातील फायर युनिट, नर्सिंग होम, डॉक्टरांचे डिग्री प्रमाणपत्र, नोंदणी, मुळ कागदपत्रे, बायोमेडिकल आदी बाबींची तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे देण्यात येईल.बीएचएमएस, बीयुएमएस, डीएचएमएस डिग्री घेवून वैद्यकीय व्यवसाय करणार्या डॉक्टरांकडून समितीने आवश्यकता वाटल्यास लेखी नोंद घेतली आहे. त्यात आपल्या पॅथी व्यतिरिक्त इतर कोणत्याही पॅथीतून उपचार करीत नसल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे भविष्यात एखाद्या डॉक्टरने कक्षा ओलांडून व्यवसाय केल्यास कारवाई करण्यात येईल. ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत काही जण बोगस वैद्यकीय व्यवसाय करतात. काहींकडे पदवी एका पॅथीची असते तरी रुग्णांवर वेगळ्या पॅथीनुसार उपचार केले जातात.