बोगस नोकरभरती प्रकरणी मुख्य संशयित पाटीलच्या कोठडीत वाढ

0

भुसावळ । औष्णिक विज निर्मिती केंद्र (दीपनगर) येथील बोगस नोकर भरती प्रकरणी अटकेत असलेला योगेश उर्फ बबलू बापू पाटील यास सोमवार 15 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता 19 मे पर्यंत पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दीपनगर येथे बोगस नोकर भरती प्रकरणी दीपनगर प्रशासनातर्फे दुसर्‍या गुन्ह्यात 13 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पाटील याने 12 जणांना अनुकंपा तत्वावर बनावट नियुक्त पत्रे देऊन नोकरीस लावले होते. या प्रकरणी पाटील याच्या सोबत आणखी काही दीपनगरचे अधिकारी सामील आहेत का? त्याच प्रमाणे या गुन्ह्यात पाटील याने तयार केलेले बनावट शिक्के व बनावट नियुक्तीपत्रे कोठे तयार केले होते? याची माहिती त्याच्याकडून मिळाल्याने परिवेक्षाधिन पोलीस अधिकारी मनिष कलवानिया यांनी न्यायालयासमोर पोलीस कोठडीची मागणी केली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. नितीन खरे यांनी सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. यावर न्यायाधिश पी.बी.वराडे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेत संशयीत आरोपी योगेश पाटील यास पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीतर्फे अ‍ॅड. मनिष सेवलानी यांनी कामकाज पाहिले.