महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे खोटी कागदपत्रे सादर
पिंपरी चिंचवड : चर्होली येथील डिलाइट डेव्हलपर्सने महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे खोटी कागदपत्रे सादर करून परवानगी मिळविली होती. यामुळे महापालिकेची फसवणूक झाली असून संबंधीत बांधकाम व्यावसायिकासह महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग, नगररचना विभाग, सिटी सर्व्हे विभागातील दोषी अधिकार्यांवरही फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असलेल्या चर्होली बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 506 येथे डिलाइट डेव्हलपर्स यांच्या वतीने ‘इको पार्क’ नावाने गृहप्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असेही भापकर यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा
अधिकार्यांकडूनही कानाडोळा…
या ठिकाणी 12 मजल्याच्या दोन इमारती उभारल्या असून, तिसर्या इमारतीचे काम सुरू केले आहे. यासाठी महापालिकेने 2015 मध्ये बांधकाम करण्याची परवानगी दिली होती. प्रकाश तापकीर आणि दिनेश पटेल यांना परवानगी मिळाली होती. संबंधित विकासकाने सुमारे 65 एकर जागेवर प्रकल्प उभारला आहे. विकासकाने सादर केलेल्या कागदपत्रांनुसार महापालिकेडून 28 फूट रस्त्यामुळे सहा मजली इमारतीस परवानगी मिळणार होती. मात्र सहा ऐवजी 12 मजली इमारतीसाठी शेजारचे जागा मालक आनंद सरवदे यांच्या जागेवर अतिक्रमण करून ती रस्त्यासाठी दाखविली. तो महापालिका अधिकार्यांनी कोणतीही शहानिशा व पडताळणी न करता मंजूर केला. ही गंभीर बाब कागदपत्रांसह पुराव्यांसह सरवदे यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
याबाबत भापकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे बांधकाम व्यावसायिकांसह दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अर्थपूर्ण व्यवहार करून सामील असणारे बांधकाम परवाना विभाग, नगररचना विभाग, सिटी सर्व्हे विभागातील दोषी अधिकार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. असेही निवेदनात म्हटले आहे. याशिवाय चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदार संघातही डिलाइट सारखी अनेक प्रकरणे आहेत. सर्व भागातील गृहप्रकल्पांचे ऑडिट करावे. दोषी बांधकाम व्यावसायिकांवरच आर्थिक दंड आकारावा, व्यावसायिकांवर फौजदारी कारवाई करावी, तसेच या प्रकरणात सामील असणार्या अधिकार्यांवर फौजदारी कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.