बोगस शिफारशीवरून साडेचौदा कोटींच्या कामाचे परस्पर नियोजन

0

सीईओ आणि कॅफो यांचे फाईली थांबिण्याचे आदेश

जळगाव: जिल्हा परिषदेत निधीवाटपाच्या मुद्द्यावरून विरोधक नाही तर सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी आहे. जिल्हा परिषदेच्या विविध केडरच्या निधी वाटपावरून सत्ताधारी भाजपात उभी फुट पडली आहे. तब्बल साडेचौदा कोटींच्या कामाचे नियोजन सदस्यांना अंधाऱ्यात ठेवून करण्यात आले आहे, एवढेच नाही तरी कामांच्या शिफारशी देखील बोगस असल्याचे आरोप सत्ताधारी भाजपासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांनी केले आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन जि.प.सदस्यांनी आम्हाला निधीवाटपातून डावलत परस्पर नियोजन करण्यात आल्याचे आरोप केले. यात भाजपचे जि.प.सदस्या लालचंद पाटील, सदस्या पल्लवी सावकारे, गजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील, मीनाताई पाटील, शिवसेनेच्या रेखा दीपक राजपूत आदी जि.प.सदस्यांनी निधीवाटपावर नाराजी व्यक्त केली आहे. यावरून स्थायी सभेत देखील गोंधळ झाला होता.

अध्यक्षांकडून पदाचा गैरवापर

जि.प.सेसफंड, शिक्षण, महिला बालकल्याण (अंगणवाडी बांधकाम), जनसुविधा, नागरीसुविधा, तीर्थक्षेत्र, आरोग्य आदी केडरमधील निधीचे परस्पर नियोजन करण्यात आले असल्याचे कागदोपत्री पुरावा सदस्यांनी दाखविले. अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना समान निधी वाटपाचे अधिकार देण्यात आले होते. मात्र अध्यक्षांनी निधी वाटप करताना पदाचा गैरवापर केल्याचे आरोप भाजपच्या जि.प.सदस्यांनी केले आहे. काही ठराविक सदस्य आणि पदाधिकारी यांनाच निधी देण्याबाबतचे नियोजन केले. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, सर्व गटनेते आणि काही ठराविक सदस्यांचा समावेश आहे. उर्वरित एकाही सदस्याला निधी वाटपाबाबत विश्वासात घेण्यात आले नाही. नियोजन थांबिण्याची मागणी करण्यात आली आहे.

या हेडखाली नियोजन

जि.प.सेसफंड ६ कोटी, शिक्षण साडेचार कोटी, महिला बालकल्याण (अंगणवाडी बांधकाम) ४ कोटी ७६ लाख, जनसुविधा-नागरीसुविधा-तीर्थक्षेत्र ४ कोटी, आरोग्य सव्वाकोटी असे एकंदरीत साडेचौदा कोटींच्या कामाचे परस्पर नियोजन करण्यात आल्याचे आरोप आहे. कामाच्या शिफारशी देखील बोगस असून शिफारशींची टायपिंग जि.प.त झालेली नसून बाहेरून झाली असल्याचे पुरावे सदस्यांनी दाखविले. मूळ शिफारस ही जि.प.चे लोगो असलेल्या बॉंड पेपरवर केली जाते, मात्र यावेळी करण्यात आलेली शिफारस ही सध्या कागदावर करण्यात आली आहे. बोगस शिफारशीवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड यांनी स्वाक्षरी कशी केली? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला.

सीईओ यांना देणार निवेदन

निधी वाटपात विश्वासात घेतले नसल्याने भाजपच्या जि.प.सदस्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कळविण्यात आले असून त्यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी आज सर्वपक्षीय जि.प.सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देणार आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांच्या वादात अधिकाऱ्यांनी पडू नये असे आवाहन देखील जि.प.सदस्यांनी केले आहे.