मिरजेसह कोल्हापूरातील त्रिकुटांविरुद्ध गुन्हा ; दुध भुकटीचा पुरवठा केलाच नाही
बोदवड- 150 टन दुध भुकटीचा पुरवठा करण्याचा करारनामा केल्यानंतरही दुध डेअरी चालकाला पुरवठा न केल्याने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील त्रिकुटाविरुद्ध बोदवड पोलिसात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा अधिक तपासासाठी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे अधिक तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.
करारनाम्यानंतरही भुकटीचा केला नाही पुरवठा
तक्रारदार अमरलाल परमानंद खत्री (रा.बोदवड) यांची नाडगाव रस्त्यावर अमर डेअरी आहे. संशयीत आरोपी अमित बाबासो. शेळके तसेच अनुप भगवान काळे (माऊली फुडस् अॅण्ड अॅग्री प्रोसेसिंग प्रा.लि., एड्रा, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर) व प्रशांत उर्फ सोमनाथ प्रकाश मंगरूळकर (टाकळी रोड, गुलमोहर कॉलनी, मिरज, जि.सांगली) यांनी 27 फेब्रुवारी 2017 नंतर खत्री यांच्याशी संपर्क साधून 150 टन दुध भुकटी पुरवण्याचा करारनामा केला शिवाय त्यापोटी फिर्यादीकडून दोन कोटी 75 लाखांची रक्कम घेत ती मंगरूळकर यांच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. रक्कम दिल्यानंतरही दुध पावडरचा कराराप्रमाणे करण्यात न आल्याने रविवारी रात्री आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सतीश भामरे करीत आहेत.