बोदवडच्या पुरवठा अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा : सदस्यास केली शिविगाळ

0

बोदवड- भाजपचे पंचायत समिती सदस्य किशोर गायकवाड यांना शिविगाळ केल्याप्रकरणी बोदवडचे पुरवठा अधिकारी संजय पाटील यांच्याविरुद्ध बोदवड पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी दुपारी एक वाजता बोदवड येथील कल्पनाबाई संतोष पोतदार (वय 55) या तहसील कार्यालयात पुरवठा अधिकारी संजय पाटील यांच्याकडे गेल्या असता रेशनकार्डत नातवाचे नाव समाविष्ट करण्याबाबत त्यांनी अधिकारी पाटील यांना विचारणा केली मात्र, त्यांनी असभ्य भाषेचा वापर करून शिविगाळ केली, अशी कैफियत पोतदार यांनी भाजपचे पंचायत समिती सदस्य किशोर गायकवाड यांच्याकडे मांडली. यानंतर गायकवाड यांनी पुरवठा अधिकारी पाटील यांना झालेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली मात्र त्यांनी पुन्हा शिविगाळ करून उर्मट भाषा वापरली, असा गायकवाड यांचा आरोप आहे. तसेच पाटील यांना निलंबित करावे, या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे टपाली तक्रार केली आहे. सोबतच कल्पनाबाई पोतदार यांनी देखील पुरवठा अधिकार्‍याविरुद्ध बोदवड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.