डीएनएसाठी चाचणीसाठी हाडांचे घेतले नमूने ; कुटुंबियांची होणार डीएनए
भुसावळ– मारहाणीच्या गुन्ह्यात बोदवड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रेकॉर्डवरील संशयीत अचानक बेपत्ता झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर टिकेची झोड उठली होती तर वरणगाव रेल्वे स्थानकावर अनोळखी इसमाचा झालेला मृत्यू हा त्या बेपत्ता झाल्याचा संशयीताचाच असल्याचा दावा कुटुंबियांनी केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी वरणगावच्या भोगावती नदीपात्राजवळ पुरलेल्या अनोळखी मृतदेहाची कबर खोदून हाडांचे डीएनए नमूने घेतले. दरम्यान, अहवाल आल्यानंतरच तो मृतदेह बेपत्ता झालेल्या रवींद्र ठाकरेचा की अन्य दुसर्या इसमाचा याबाबत उलगडा होणार आहे तर डीएनए अहवालानंतर ठाकरे यांच्या कुटुंबियांचीही डीएनए चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलीस ठाण्यातूनच बेपत्ता झाला संशयीत ?
बोदवडमधील एका मद्याच्या दुकानावर झालेल्या वादा-वादीनंतर एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र सुभाष ठाकरे (25) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात धडक देत संशयीतावर 394 चा गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यावेळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत बनकर यांनी कारवाईचे आदेश देत ठाकरेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता व उपनिरीक्षक खरे यांच्यासह अन्य कर्मचार्यांना ठाकरे यास चौकशीकामी ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही घटना 21 मार्च 2017 रोजी घडली होती. याच दिवशी बनकर यांना मुंबईत साक्षीचे काम निघाल्याने ते रवाना झाले होते तर दुसर्या दिवशी मुलगा रात्रभर घरी न आल्याने रवींद्रच्या आईने पोलीस ठाणे गाठून मुलगा कुठे आहे? अशी विचारणा करीत संताप व्यक्त केला होता. पोलिसांनी मात्र त्यास रात्रीच सोडल्याचे त्यावेळी सांगितले असलेतरी नातेवाईकांनी मात्र रवींद्र पोलीस ठाण्यातूनच बेपत्ता झाल्याचा आरोप करीत पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त केला होता.
वरणगावात आढळला मृतदेह
रवींद्र कधी जंगलात लपला आहे तर कधी अन्य ठिकाणी लपला असल्याची माहिती कानी पडल्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम राबवली होती मात्र त्यानंतरही त्यांना यश आले नाही तर सूत्रांच्या माहितीनुसार 21 मार्च 17 रोजी वरणगावच्या रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पट्ट्यावर एका अनोळखीचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर ओळख न पटल्याने पोलिसांनी 31 मार्च रोजी हे प्रकरण बंद करीत भोगावती नदीपात्राजवळ अनोळखी म्हणून मृतदेहाचे दफन केले होते. ठाकरे यांच्या परीवाराला मात्र दफन करण्यात आलेला मृतदेह रवींद्रचाच असल्याचा संशय असून त्यांनी त्याबाबत पोलिसांकडे चौकशी करण्याकामी आग्रह धरला होता
वरणगावात अखेर खोदली कबर
वरणगावातील भोगावती नदीपात्रालगत अनोळखी म्हणून दफन केलेली कबर मंगळवारी दुपारी बंदोबस्तात खोदण्यात आली. त्यासाठी प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांच्या समक्ष बाहेर काढण्यात आला. प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल, दोन सरकारी पंच तसेच वरणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. मृतदेहाच्या हाडाचे नमूने डीएनए टेस्टसाठी घेण्यात आले असून अहवाल आल्यानंतर ठाकरे कुटुंबियांचीदेखील डीएनए टेस्ट केली जाणार आहे. अहवाल मॅच झाला तर पोलीस रवींद्र ठाकरे वरणगावात पोहोचला कसा व त्याचा मृत्यू झाला कसा? या बाबीचा उलगडा करतील, अशी शक्यता आहे.
पोलीस ठाण्यातील डीव्हीआर मुंबईत ?
समजलेल्या खात्रीशीर माहितीनुसार बोदवड पोलीस ठाण्यात संशयीताला ज्या दिवशी मारहाण झाली त्याबाबतचे फुटेज तपासणीसाठी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर मुंबईतील कलिना लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. याबाबत अद्याप अहवाल मिळालेला नाही मात्र तो आल्यानंतर दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
रवींद्रचा मृत्यू पोलीस कोठडीतच -सुनील गायकवाड
संशयीत म्हणून रवींद्रला ताब्यात घेऊन पोलिसांनी लॉकअपमध्ये मारहाण केली तसेच तक्रारदाराच्या कार्यकर्त्यांनीही त्यास मारहाण केल्याने त्याचा लॉकअॅपमध्येच मृत्यू झाला व पोलिसांनी मृतदेह वरणगाव रेल्वे रूळावर आणून टाकला, असा आरोप आदिवासी एकता परीषदेचे महाराज्य राज्य संपर्क प्रमुख सुनील गायकवाड यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना केला. ते म्हणाले की, रात्री रवींद्रची आई व पत्नी पोलीस ठाण्यात आल्या तेव्हा पोलिसांनी जामिनासाठी सकाळी न्यायालयात या, असे सांगितले मग तो रात्रीतून गायब झालाच कसा? यापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल असून आता दोषी उपनिरीक्षक सिद्धार्थ खरे व सोबत आलेल्या व त्या दिवशी रात्र ड्युटीवर असलेल्या पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी करणार आहोत. वरणगावच्या भोगावती काठावरील मृतदेह हा रवींद्रचाच असल्याची ओळख आधीच समाजासह नातेवाईकांनी पटवली आहे व आमच्या मागणीनुसार आज मृतदेहाची डीएनए टेस्ट करण्यात आली.