बोदवडमध्ये गुरे चोरट्यांच्या हल्ल्यात दोघे जखमी : दोघांना अटक
पाच जणांविरोधात गुन्हा : तरुणांच्या सतर्कतेने चोरटे अडकले जाळ्यात
बोदवड : पशूधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर तरुणांनीच गोठ्या भोवती पहारा देत पशुधनाचे संरक्षण सुरू केले असतानाच शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास जामठी रस्त्यावरील बळीराजा मंगल कार्यालयाजवळ काही तरुण गस्तीवर असताना गजानन आनंदा पाटील यांची गाय चोरीस गेल्याची माहिती तरुणांना कळाली. त्यानंतर तरुणांनी वाहनांवर पाळत ठेवली असता एका भरधाव दुचाकीवर दोघे तरुण जात असतानाच त्यांच्या दुचाकीमागे भरधाव चारचाकीदेखील जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणांनी हिंमत करून दुचाकी अडवली असता अज्ञातांनी तरुणांच्या अंगावर चारचाकी वाहन आणल्याने शांताराम रामदास खराटे (55, जामठी दरवाजा, बोदवड) यांच्या छातीला दुखापत होवून पाय फ्रॅक्चर झाला तर एका संशयीताने चाकूने हल्ला केल्याने राजू फकिरा पांचाळ (45) हे जखमी झाले. तरुणांच्या झटापटीत दोघांना पकडण्यात यश आले तर चारचाकीतील भामटे पसार झाले. शेख शोएब शेख उस्मान (धाड, जि.बुलढाणा) व मुजफर अली अजगर अली (पाळधी, ता.धरणगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांच्याकडून दोन धारदार चाकू व दुचाकी (एम.एच.19 एक्स. 7143) लप्त करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गायीसह अन्य तिघे चोरटे पसार
यावेळी तरुणांनी काही अंतरापर्यंत चारचाकीचा पाठलाग केला मात्र वाहन भरधाव वेगात असल्याने चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. बोदवड पोलिसांच्या पथकानेही चोरट्यांचा सिल्लोडपर्यंत पाठलाग केला मात्र ते हाती लागले नाहीत.
पाच जणांविरोधात गुन्हा
अटकेतील शेख शोएख शेख उस्मान व मुजफर अली अजगर अली यांना बोदवड पोलीस ठाण्यात आणल्यानंतर खाक्या दाखवल्या असता त्यांच्या ताब्यातून दोन धारदार चाकू व मोबाईल तसेच दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपींनी चारचाकीत यासीन ईस्माईल खान (मालेगाव), दानीश (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) व समीर (नाव पत्ता माहीत नाही) असे साथीदार असल्याची माहिती दिली. पाच आरोपींविरोधात सचिन राजू पाटील यांच्या फिर्यादीवरून भादंवि 307, 395, 397, 398 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शरद माळी करीत आहेत.