बोदवडमध्ये दिवसा घरफोड्या : पावणेतीन लाख लंपास

0

बोदवड : शहरात सातत्याने वाढत असलेल्या चोर्‍या-घरफोड्यांनी सर्वसामान्यांसह व्यापारी त्रस्त असतानाच सोमवारी चक्क भरदिवसा दोन घरे फोडून चोरट्यांनी पोलिसांना पुन्हा सलामी दिल्याने शहरात खळबळ डाली आहे. शहरातील विद्या कॉलनीतील रहिवासी प्रदीप सुकाले व श्याम नगरातील मुक्ताई मंगल कार्यालयाजवलील रहिवासी दिवाणसिंग नवलसिंग पाटील यांच्याकडे चोरट्यांनी हात की सफाई दाखवत दोन लाख 67 हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे.

पोलिसांकडून चोरट्यांचा शोध
प्रदीप समाधान सुकाळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यांचे आई-वडील बहिणीच्या बाळंतपणासाठी पुणे येथे गेले आहेत तर पत्नी रक्षाबंधनाच्या सणासाठी मुलांसह नाशिक येथे माहेरी गेल्या आहेत. सुकाळे हे सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जलचक्र येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. शेजारच्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर त्यांनी सुकाळे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेतली असता बेडरूममधील कपाटाच्या लॉकरमधून शेत जमीन घेण्यासाठी असलेले पैसे चोरट्यांनी लांबवल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दोन लाख 57 हजारांची रोकड लांबवली. दुसर्‍या घटनेत मुक्ताई मंगल कार्यालयाजवळील श्याम नगरातील रहिवासी दिवाणसिंग नवलसिंग पाटील यांच्याकडे चोरी झाल्याचे उघडकीस आले. दिवाणसिंग पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी आठ हजारांची रोकड लांबवल्याने या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.