बोदवडमध्ये बर्निंग आयशरचा थरार !

0

इलेक्ट्रीक पोलला धक्का लागल्याने वाहनाचे नुकसान ; 50 हजारांचा सात क्विंटल कापूसही जळाला

बोदवड- शहरातील माता वैष्णवी जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंगचा सुमारे 70 क्विंटल कापूस वाहून नेणार्‍या आयशर वाहनाला मनुर रोडवरील शिव जिनिंगजवळ तिरप्या झालेल्या इलेक्ट्रीक पोलचा धक्का लागल्याने वाहनाला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी 3.20 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे 50 हजार रुपये किंमतीचा सात क्विंटल कापूस खाक झाला तर आयशर वाहनाचे दर्शनी भागासह मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मात्र सुदैवाने प्राणहानी टळली. आगीनंतर जिनिंगच्याच बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

इलेक्ट्रीक पोलमुळे लागली आग
बोदवडचे व्यापारी अभय कुशलचंद बाफना (जैन मंदिराजवळ, बोदवड) यांचा कापूस घेवून मनुरकडून बोदवडकडे निघालेली आयशर (एम.एच.19 झेड.2281) ही सोमवारी दुपारी 3.20 वाजेच्या सुमारास मनुर बु.॥ रोडवरील शिव जिनिंगजवळून जात असताना रस्त्यावरील तिरप्या झालेल्या इलेक्ट्रीक पोलचा आयशरला धक्का लागल्याने स्पार्किंग होवून कापसाला आग लागली. पाहता-पाहता आगीचा भडका वाढल्यानंतर जिनिंगमधून तातडीने पाण्याचा टँकर मागवून आगीवर नियंत्रण मिळवता आले मात्र तो पर्यंत सात क्विंटल कापसाचा कोळसा झाला तर पाण्याचा मारा करून अन्य कापसाचे नुकसान मात्र टळले तर आयशर वाहनाच्या दर्शनी भाग पूर्णपणे जळून वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या प्रकरणी बोदवड पोलिसात अभय बाफना यांच्या खबरीनुसार अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विलास महाजन करीत आहेत.