बोदवडमध्ये स्टेट बँकेने सुरक्षा रक्षक न ठेवल्याची संधी चोरट्यांच्या पथ्थ्यावर
बोदवडमधून अवघ्या दहा मिनिटात 31 लाख 10 हजारांची रोकड घेवून चोरटे पसार : श्वान पथक काही अंतरावर घुटमळले : तीन चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद
Lack Of Security Guards In Bodwad On The Path of Thieves बोदवड : वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर स्टेट बँकेचे एटीएम असतानाही बँकेने सुरक्षा रक्षक न नेमण्याची हलगर्जी चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली व बँकेच्या एटीएममधील 31 लाख 10 हजारांची रोकड लुटून चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. शहरातील जवळपास तीन एटीएमवर सुरक्षा रक्षकांचा अभाव असून पोलिस प्रशासनाने यापूर्वीच संबंधित बँकांना पत्र दिले असतानाही बँक प्रशासन अद्यापही बेपर्वा असल्याची बाब शहरात उघड झाली आहे. दरम्यान, मुक्ताईनगर रस्त्यावरील स्टेट बँकेच्या एटीएममधून रोकड लांबवताना तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. श्वान पथकाने काही अंतरापर्यंतचा माग दाखवल्याने चोरटे वाहनातून पसार झाल्याची शक्यता आहे.
माहितगार टोळीवर संशय
वर्दळीच्या रस्त्यावरून सहज पळणे शक्य असल्याने तसेच सुरक्षा रक्षक नसल्याची बाब चोरीसाठी योग्य असल्याने माहितगार चोरट्यांनी स्टेट बँकेच्या एटीएमची निवड केल्याची शक्यता अधिक आहे शिवाय सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही चोरी झाल्याने त्यावेळी पोलिसांची रात्र गस्त समाप्त होत असल्याने ही बाबही चोरट्यांसाठी अनुकूल ठरल्याचे बोलले जात आहे. चोरट्यांनी ज्या अर्थी गॅस कटरने एटीएम फोडले त्याअर्थी त्यांना एटीएम मशीन फोडण्याबाबत माहिती असावी व ते सराईत असावेत, अशीदेखील शक्यता आहे. गॅस कटरने शक्यतो हरीयाणातील टोळ्या एटीएम फोडतात मात्र एकाचवेळी अनेक शहरातील एटीएममध्ये चोर्या केल्या जातात येथे मात्र केवळ बोदवडमध्ये हा प्रकार घडल्याने स्थानिक तसेच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांकडे पोलिस प्रशासनाने लक्ष वेधले आहे.
शुक्रवारीच भरली होती 30 लाखांची रोकड
बोदवड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील मुक्ताईनगर रस्त्यावर स्टेट बँकेची वर्दळीच्या रस्त्यावर शाखा असल्याने दररोज तालुक्यातील एसबीआय ग्राहक येथे येतात त्यामुळे दर आठवड्याला व ट्रान्झेक्शन पाहून रोकडचा भरणा एटीएममध्ये केला जातो तर गत शुक्रवारी या एटीएममध्ये 30 लाखांची रोकड भरण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे व त्याबाबत कानोसा घेवूनच चोरट्यांनी चोरी केल्याचा कयास आहे. एटीएम फोडण्यापूर्वी चोरट्यांनी या परीसराची रेकी केली असावी व नंतर काम फत्ते केले असावे, असादेखील अंदाज आहे. रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास तीन चोरटे सीसीटीव्ही कैद झाले असून त्यांनी सुरूवातीला सीसीटीव्ही कॅमेर्यांवर काळा स्प्रे मारला व नंतर गॅस कटरने एटीएम फोडत 31 लाख 10 हजारांची रोकड लांबवली अवघ्या दहा मिनिटात लांबवली तर तब्बल 24 तासानंतर सोमवारी सकाळी एटीएम फोडल्याची बाब उघडकीस आली हेदेखील विशेष !
पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे गॅस कटरद्वारे ज्यावेळी एटीएम मशीनमधून रोकड चोरी होते त्यावेळी मशीन तापल्यानंतर त्याचा संदेश सर्व्हरला जातो त्यामुळे याबाबत अंदाज यंत्रणेला कसा आला नाही? असा प्रश्न आहे शिवाय वर्दळीच्या भागात धाडसी चोरी होत असताना पोलिस यंत्रणेच्या गस्तीबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिस यंत्रणेची घटनास्थळी धाव
एटीएम फोडण्यात आल्याची घटना कळताच बोदवडचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व सहकार्यांनी धाव घेतली तसेच जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेतली. जळगाव येथून ठसे तज्ज्ञांसह डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले आहे. श्वान पथकाने एटीएमपासून काही अंतरापर्यंतचा माग दाखवला. पोलिसांनी नजीकच्या सीसीटीव्हीची तपासणी करीत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेचे शाखा व्यवस्थापक जयेश गंगवाल यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व सहकारी करीत आहेत.