बोदवड : शहरातील जय माता दी नगरातील घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील जय माता दी नगरात युवराजसिंग लक्ष्मणसिंग परदेशी कुटुंबासह राहतात. परदेशी कुटुंब कामानिमित्त गावाला गेल्याने 21 ते 22 दरम्यान घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील चाळीस हजार रुपये किमतीच्या कानातील रिंग, आठ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बाळ्या, आठ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या तसेच पाच हजार रुपये किमतीचा चांदीचा वाळा व 35 हजारांची रोकड असा एकूण 96 हजारांचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. दरम्यान, चोरटे शहरातील बंद घरांना टार्गेट करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी अपेक्षा नागरीकांमधून व्यक्त होत आहे.