बोदवडला देशी दारूची बेकायदा वाहतूक ; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

0

बोदवड- देशी दारूची विना परवाना वाहतूक केल्याप्रकरणी बोदवड पोलिसांनी केलेल्या दोन लाखांच्या वाहनासह 75 हजारांची दारू जप्त करण्यात आली. 19 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही कारवाई जामठी रस्त्यावरील जय ढाब्याजवळ करण्यात आली. पोलिस कॉन्स्टेबल मुकेश पाटील यांच्या तक्रारीवरून आरोपी भारत भागवत जैस्वाल (मोयखेडा दिगर, ता.जामनेर, जि.जळगाव) विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. आरोपीस 20 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
चारचाकी वाहनातून विना परमीट दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक राजमहेंद्र बाळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 19 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जामठी रस्त्यावरील जय ढाब्याजवळ चारचाकी ओमनी (एम.एच.46 एन.5570) थांबवून तिची तपासणी केली असता त्यात 72 हजार 500 रुपये किंमतीचे देशी दारूचे 29 खोके तसेच कोकण कंपनीची दोन हजार 500 रुपये किंमतीची देशी दारू आढळली. आरोपीजवळ दारू वाहतुकीबाबत परवाना नसल्याने दोन लाखांच्या वाहनासह दारू जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय भोसले करीत आहेत. दरम्यान, आरोपीच्या पोलिस कोठडीदरम्यान त्याने दारू कुठून व कुणाकडून आली तसेच या प्रकारात कोण-कोण सहभागी आहेत? याची माहिती कळणार आहे.