दुष्काळग्रस्त तालुका तालुका वाळवंट म्हणून घोषीत होण्याची अपेक्षा
भुसावळ (प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील जिनींग व्यवसायामध्ये अग्रेसर असलेला बोदवड तालुका दरवर्षी दुष्काळग्रस्त तालुका म्हणून शासनाकडून घोषीत केला जातो मात्र हा तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी अद्यापपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने ठोस पावले उचलली नसल्याने हा तालुका वाळवंट होत असल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष कोळी यांनी सोशल मिडीयातून केला आहे. शिवाय त्यांनी हा तालुका वाळवंट म्हणून घोषीत करा, अशी मागणीही केली आहे.
सोशल मिडीयातून लोकप्रतिनिधींचे टोचले कान
बोदवड शहरात 20 डीआर आणि एक अॅटोमॅटीक जिनींग अशा मोठ्या प्रमाणात जिनींगचा व्यवसाय असल्याने शहरासह तालुक्यातील मजुरांना गणेशोत्सवापासून किमान नऊ महिने रोजगाराची संधी उपलब्ध होते यामुळे येथील बाजारपेठेला आर्थिक उलाढालीमुळे मोठे महत्व प्राप्त होते. शिवाय बोदवड तालुक्यातून विधानसभा, विरोधी पक्षनेते खासदार अशी विविध प्रकारच्या लोकप्रतिनीधींना विजयी पाठबळ दिले आहे.सन 1989 पासून म्हणजेच सुमारे 30 वर्षांपासून या तालुक्यातील लोकप्रतिनिधी विधानसभेवर राज्य करीत आहेत मात्र या लोकप्रतिनिधींनी हा तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलली नसल्याने 30 वर्षांमध्ये कित्येक वेळा बोदवड तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला. परीणामी, बोदवड शहर व तालुक्यातील नागरीकांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. बोदवड शहरापासून अवघ्या काही अंतरावर हतनूर धरण आहे. मात्र हतनूर धरणातून अद्यापही या तालुक्यात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली नाही. यामुळे हा तालुका पाण्याची झळ सोसतोय चांगला पावसाळा झाला तरीही येथे पाण्याची समस्या कायम असते. परीणामी मोठ्या प्रमाणात शहरवासी व तालुक्यातील नागरीकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शिवसेनेचे तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष कोळी यांनी तर सोशल मिडीयातून हा तालुका वाळवंट म्हणून घोषीत करण्याचा उपहासात्मक टोला लोकप्रतिनिधींना लगावला आहे.