बोदवड नगरपंचायतीत हातघाई; मुख्याधिकार्‍यांसोबत वाद

0

बोदवड। थकीत वेतनासाठी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. निलेश देशमुख यांची बुधवार 12 रोजी भेट घेतली असता त्यांची चर्चा फिसकटून शाब्दिक चकमक उडाल्याने हातघाई झाल्याची चर्चा होती. मात्र, मुख्याधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीची कारवाई करावी म्हणून लिपीक तुळशीराम तायडे यांनी पोलीसात तक्रार दिली आहे. यासाठी कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. परंतु कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नसल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

नगरपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन व मानधन गेल्या आठ महिन्यांपासून थकीत आहे. यासाठी कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता. यामुळे शहरात साफसफाई, पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. संप पुकारल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष तुळशीराम तायडे यांसह जिल्हाध्यक्ष पी.जे. पाटील यांनी मुख्याधिकार्‍यांशी चर्चा केली. मात्र ही चर्चा फिसकटल्यामुळे कर्मचारी संतापले याचा परिणाम म्हणून 12 रोजी कर्मचारी मुख्याधिकार्‍यांच्या कॅबिनमध्ये गेले होते.