बोदवड नगरपंचायत नगराध्यक्षपदी आनंदा पाटील

उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड : निवडीनंतर पदाधिकार्‍यांनी बोदवड शहरात केला जल्लोष ः मिरवणुकीने वेधले लक्ष

बोदवड : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या बालेकिल्ल्यातील बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेने सत्ता पटकावली होती तर शुक्रवार, 18 रोजी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही शिवसेनेने बाजी मारत भगवा फडकवला. नगरपंचायत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा पाटील तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड करण्यात आली.

अखेर नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता
शुक्रवार, 18 रोजी बोदवड नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. त्यात नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे आनंदा पाटील व राष्ट्रवादीकडून योगीता खेवलकर यांनी अर्ज सादर केले होते तर उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून रेखा गायकवाड व राष्ट्रवादीकडून मुज्जमील शाह यांनी अर्ज सादर केले. सभेत हात उंचावून मतदानघेण्यात आले. त्यात शिवसेनेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना शिवसेनेचे नऊ नगरसेवक आणि भाजपच्या एकमेव उमेदवाराने मतदान केल्याने शिवसेना नगरसेवकांची पदावर वर्णी लागली.

शिवसैनिकांनी जल्लोष करीत काढली मिरवणूक
शिवसेना नगरसेवकांची पदावर वर्णी लागताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. बोदवड नगरपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणे उपस्थित होते. त्यांना सहाय्यक म्हणून नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफोडे यांनी सहकार्य केले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून फुलांच्या पाकळ्या व गुलालाची उधळण करीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी प्रचंड जल्लोषात मिरवणूक काढली.

दर्ग्यावर चढवली चादर
बोदवडची ग्रामदेवता रेणुका देवी मंदिरात दर्शन घेऊन शिवद्वारवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर गांधी चौकाजवळील बोदवड शाहवली बाबा यांच्या मजारवर चादर चढवण्यात आली तसेच आमदारांसह नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले आणि भिल वाडीजवळ एकलव्य तसेच भुसावळ चौफुली वर महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

आता विकास हेच लक्ष्य : आमदार
बोदवडकरांनी बोदवड शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला सत्ता दिली असून शिवसेनेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून शहराचा विकास हाच आता ध्यास असेल. पाणी प्रश्नाला प्राधान्य देऊन पुढे सर्वांगीण विकास करण्यात येईल, अशी भावना आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.