बोदवड नगरपंचायत निवडणुकीत खडसेंना हादरा : शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व
राष्ट्रवादीला सात तर शिवसेनेला नऊ जागांवर यश ः ईश्वर चिठ्ठीतून भाजपाने नशीब फळले
भुसावळ : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 पैकी 9 जागांवर शिवसेनेने यश मिळवले तर राष्ट्रवादीला सात तसेच भाजपाला अवघ्या एका जागेवर (तेही ईश्वरचिठ्ठीतून) समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजपाला व पर्यायाने माजी मंत्री गिरीश महाजन यांनादेखील मतदारांनी नाकारल्याचे वास्तव चित्र निवडणुकीतून दिसून आले आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा लागली होती पणाला
बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे तसेच भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बोदवड नगरपंचायतीतील निकालाचा आगामी राजकीय समीकरणांवर परीणाम होणार असल्याने नेत्यांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांची रणनीती त्यात यशस्वी ठरली आहे. निवडणुकीच्या दोन दिवस आधी माजी मंत्री गिरीश महाजन व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वाटाघाटीमुळे या निवडणुकीचा निकालावर परीणाम झाल्याचे जाणकारांना वाटते. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा होमपीचवर पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा रंगताना दिसून आली. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांसह समर्थकांनी जल्लोष केला.