बोपखेलकर पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसणार!

0

पिंपरी-चिंचवड : लष्कराने बोपखेलकरांचा रस्ता बंद केल्याने मागील दोन वर्षांपासून गावकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बंद करण्यात आलेला रस्ता पुन्हा सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी गावकर्‍यांनी अनेक आंदोलने केली. तर नोव्हेंबर 2016 मध्ये संतोष घुले या गावकर्‍याने नऊ दिवस उपोषण केले होते. मात्र, आश्वासनांशिवाय गावकर्‍यांना काहीच मिळाले नाही. बोपखेलकरांना त्यांचा हक्काचा रस्ता मिळावा, यासाठी येत्या पाच मेपासून पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पुन्हा उपोषण करणार असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले आहे.

पाच मेपूर्वी प्रश्‍न सोडवा
जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना या उपोषणासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये, गावकर्‍यांच्या हितासाठी रस्त्याचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. गावकर्‍यांसाठी मुळा नदीवर तात्पुरत्या स्वरुपात पूल उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर बोपखेलचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, आचारसंहिता संपून एक महिना झाला. तरीदेखील अद्याप प्रशासन पातळीवर कोणतीच हालचाल सुरू नसल्याचे दिसून येत आहे. पुन्हा पावसाळा आला की, पुराचे कारण देऊन तात्पुरता पूल टाकता येणार नाही, असे रडगाणे पुन्हा सांगितले जाईल, असे गावकर्‍यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाच मेपूर्वी ठोस निर्णय न घेतल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

बोपखेलकरांच्या समस्या सुटेना
मागील वर्षी संतोष घुले यांनी निवासी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर उपोषण सोडले होते. या दरम्यान, बोपखेलकरांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बैठकीसाठी बोलावण्यात आले. परंतु या बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने बोपखेलकरांच्या समस्या कायम आहेत. दरम्यानच्या काळात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने सर्वच कामे ठप्प झाली होती. आता महापालिकेत सत्ता परिवर्तन झाले आहे. केंद्रामध्येदेखील भाजपचे सरकार आहे. त्यामुळे आता तरी बोपखेलचा प्रश्न सुटेल का, असा प्रश्न बोपखेलकरांना पडला आहे.