बोपखेल-दिघी रस्ता रुंदीकरण लवकरच

0

खासगी वाटाघाटीतून रस्त्यासाठी भू-संपादन

आळंदी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील बोपखल ते दिघी या दोन किलो मीटरच्या रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या रुंदीकरणासाठी खासगी वाटाघाटी करुन भूसंपादनासाठी येणार्‍या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. याशिवाय बोपखेल ते आळंदी दरम्यान बीआरटी मार्गावर बसथांबे उभारण्यासाठी 8 कोटी 13 लाख रुपयांच्या खर्चास देखील मान्यता दिली आहे. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

बॅरिकेटस् उभारण्याचे काम अंतीम टप्प्यात…

आळंदी ते पंढरपूर हा पालखी महामार्ग म्हणून राज्य सरकारने घोषीत केला आहे. या महामार्गाचे रुंदीकरण आणि वारकर्‍यांना सुविधा परवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. बोपखेल ते आळंदी व्हाया दिघी हा पालखी मार्ग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जातो. हा मार्ग पिंपरी-चिंचवड महापालिका विकसित करणार आहे. 60 मीटर रुंद मार्गावर पुणे-आळंदी बीआरटी मार्ग देखील तयार केला असून बॅरिकेटस् उभारण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. बोपखेल ते दिघी हा दोन किलो मीटरचा मार्ग लष्करी हद्द व वीएसएनएल आणि टाटा कम्युनिकेशन जवळून जात असल्याने अद्यापही या जागेचे संपादन झाले नाही. त्यामुळे येथे वाहतुकीची कायम कोंडी होते. व्हीएसएनएल आणि टाटा कम्युनिकेशनशी चर्चा करून, खासगी वाटाघाटीतून रस्त्यासाठी भू-संपादन करण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव स्थायीने मंजूर करून खर्चासही मंजुरी दिली.

थांब्यांसाठी सव्वा आठ कोटी…

आळंदी-पुणे बीआरटी मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बॅरिकेट्सचे काम पूर्ण झाले आहे. बसथांबे व तांत्रिक कामांची पूर्तता करणे बाकी आहे. यासाठी किमान चार महिने लागतील. येत्या मार्चमध्ये हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी या मार्गावर बसथांबे उभारण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेत मेसर्स कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. च्या 2.10 टक्के कमी दराच्या 8 कोटी 13 लाख रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

रस्ता रुंदीकरणाची प्रतीक्षाच…

बोपखेल ते दिघी रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत अनेक वर्षे केवळ चर्चा, ठराव असे कागदी घोडे नाचवले जात आहेत. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या काळात महापालिकेच्या अधिकार्‍यांनी व्हीएसएनएलच्या कोलकाता येथील कार्यालयात रस्ता रुंदीकरणाचे सादरीकरण केले होते. त्या रस्ता रुंदीकरणाबाबत व्हीएसएनएल प्रशासन सकारात्मक देखिल होते. मात्र, अद्यापही रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया रखडली आहे.