आ. जगताप यांच्या प्रयत्नांना यश
पिंपरी : महानगरपालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शिवली असून, भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. संरक्षण खात्याने या जागेची 25 कोटी 81 लाख 51 हजार 200 रुपये इतकी किंमत सांगितली आहे. या जागेच्या बदल्यात संरक्षण विभागाच्या जागेलगत पर्यायी जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी, असे पत्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना पाठविले. त्या संदर्भात महानगरपालिका पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात खर्चाची तरतूद
बोपखेलमधून पुढे खडकीत 512 येथे निघणारा पर्यायी रस्ता कायमस्वरूपी करण्यासाठी मुळानदीवर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात खर्चाची तरतूदही करण्यात आली. मात्र खडकीच्या दारूगोळा कारखान्याच्या आसपास निघणार्या रस्त्यासाठी लष्कराचे ना-हरकत प्रमाणपत्र व उड्डाणपुलासाठी जागा मिळत नसल्याने बोपखेल आणि खडकीदरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल रखडला होता. तो प्रश्न आता मार्गी लागला आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी उड्डाणपूल व रस्त्यासाठी लष्कराने जागा द्यावी. यासाठी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले होते. तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, अरूण जेटली
आणि विद्यमान संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. लष्कराने बोपखेल आणि खडकीदरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी आवश्यक जागा देण्याची तयारी दाखविली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना 4 एप्रिल 2018 रोजी संरक्षण खात्याचे रक्षा संपदा अधिकारी राजेंद्र पवार यांनी पत्र पाठविले आहे.