बोपोडीत भीषण आगीच्या घटनेत वखार जळुन खाक

0

खडकी- दिपावली पाडव्याच्या दिवशी   पहाटे बोपोडी येथील एका लाकडाच्या वखारीस भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत वखार जळुन खाक झाली. या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला असून तब्बल पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलास आग आटोक्यात आणण्यात यश आले. भाऊ पाटील रस्त्यावरील छाजेड पेट्रोल पंपासमोरील वखारीस गुरुवारी पहाटे पाच वाजता भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, या आगीचे धुराचे लोळ शिवाजी नगर, खडकी, दापोडीपर्यंत दिसत होते. खडकी कँन्टोन्मेंट बोर्ड, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महापालिका येथिल पाच ते सहा अग्निशामक दलाचे बंब तातडीने घटना स्थळी आले. मात्र वखारीचे दरवाजे शटर पद्धतीचे असल्याने तसेच सर्वत्र लाकडाच्या फळ्या रचुन ठेवल्याने अग्निशामक पथकास आग आटोक्यात आणण्सासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

एकजण किरकोळ जखमी
स्थानिक नगरसेवक प्रकाश ढोरे यांनी प्रसंगावधान राखुन तातडीने स्वतः दापोडी येथुन दोन जेसीबी आणुन अग्निशामक दलाच्या स्वाधीन केल्या. अग्निशामक दलाने जेसीबीच्या सहाय्याने वखारीची भिंत पाडुन आतील आग विझविण्याचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर आत पाणी मारुन लाकडी फळ्यांची आग आटोक्यात आणली. तब्बल पाच तासांनी सकाळी 10 वाजता आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलास यश आले. आगीच्या घटनेत वखार संपुर्णपणे जळुन खाक झाली. वखार मालक यादव यांचे शेजारी असलेल्या निवास्थानास ही आगीची झळ बसली. यादव कुटुंबियातील एक जण या घटनेत किरकोळ भाजुन जखमी झाला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन अग्निशामक दलाकडुन या सबंधी अहवाल आल्यानंतरच आगीचे नेमके कारण समजेल असे खडकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक मदन कांबळे यांनी या वेळी सांगितले.