बोपोडी सिग्नल चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॅरिस पुलाला समांतर पुल उभारणार 

0
80 टक्के पुर्ण झाले असून मार्च अखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल
महापालिकेचे उपअभियंता विजय भोजने यांनी दिली माहिती
पिंपरी : बोपोडी सिग्नल चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॅरिस पुलाला समांतर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे शेवटच्या टप्प्यातील काम वेगाने सुरू आहे. हॅरिस पुलाच्या समांतर पुलाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. येत्या तीन महिन्यांत ते काम पूर्ण करण्यात येईल. मार्चअखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजित आहे. त्यानंतर, तेथे चार पुलावरून वाहतूक सुरू होईल. तसेच ‘सीएमई’जवळ भुयारी मार्ग बांधण्यात येत असल्यामुळे, या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या देखील सुटेल, अशी माहिती उपअभियंता विजय भोजने यांनी दिली.
वाहतूक कोंडीचा सामना
पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक नगरीसोबतच मोठ्या उड्डाणपुलांचे आणि सुसज्ज वाहतूक व्यवस्था असलेले शहर म्हणूनही ओळख आहे. मात्र पुणे शहराकडून पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करतानाच नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. हॅरिस पुलावरील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रशस्त रस्त्यावरून वेगात येणारी वाहनांना अरूंद असलेल्या बोपोडी सिग्नल चौकात ब्रेक लागतो. त्यामुळे हॅरीस पुलाला समातंर पुल बांधण्याचे काम महापालिकने हाती घेतले होते. हॅरिस पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर पूल बांधण्याचा प्रकल्प मे 2016 मध्ये सुरू झाला. त्यांना दोन वर्षांची मुदत होती. प्रकल्पाचा खर्च दोन्ही महापालिका करणार आहेत. पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाणारा नवीन पूल दोन जुलै 2018  रोजी वाहतुकीला खुला करण्यात आला. बोपोडीतील झोपडपट्टीच्या स्थलांतराला विलंब झाल्यामुळे पुण्याहून पिंपरीकडे येण्याच्या  पुलाच्या बांधकामाला मे 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
प्रत्येकी चार लेन उपलब्ध होतील
बोपोडी येथील झोपडपट्टीचे जुलैमध्ये स्थलांतर झाल्यानंतर या पुलाचे शेवटच्या टप्प्यातील काम हाती घेण्यात आले. मात्र, पावसाळ्यानंतरच काम वेगाने सुरू झाले. झोपडपट्टी काढल्यानंतर त्याजागी पुलासाठी संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासोबतच पोच रस्त्यासाठी मुरूम व खडीचा भराव टाकण्यास सुरवात झाली. मुळा नदीकाठच्या रस्त्यालगत पुलाचा शेवटचा खांब बांधण्यात येत आहे. खांबाचे बरेचसे काम झाले आहे. त्यानंतर सध्या बांधलेल्या पुलापासून या खांबापर्यंतचा स्लॅब टाकण्याचे काम हाती घेण्यात येईल. हॅरिस पुलाला समांतर पूल उभारल्यानंतर दोन्ही बाजूला ये-जा करण्यासाठी प्रत्येकी चार लेन उपलब्ध होतील. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढणार आहे.