भुसावळ/जळगाव : कौटूंबिक वादातून नगरदेवळा रेल्वे स्थानकावर चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील 27 वर्षीय दोन चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या केली. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. जितेंद्र दिलीप जाधव (27, बोरखेडा, ता.चाळीसगाव) असे मयत पित्याचे तर चिराग (वय 6) व खुशी (वय 4) अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत.
कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल
चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र जाधव हा पत्नी पूजा आणि दोन मुलांसह वास्तव्यास होता. चाळीसगावातील एका मक्तेदाराकडे तो जेसीबी चालक म्हणून कार्यरत होता मात्र जितेंद्र जाधव आणि त्यांची पत्नी पुजा जाधव यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू असल्याने त्याच्याविरोधात नुकतीच चाळीसगाव पोलिसात पत्नीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पत्नी माहेरी निघून गेल्या. रविवार, 13 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जितेंद्रने चिराग व खुशी दोन्ही मुलांना सोबत घेत गाव सोडले तर इकडे कुटूंबियांनी जितेंद्रचा शोध सुरू केला.
धावत्या रेल्वेखाली उडी घेवून केली आत्महत्या
रविवारी सकाळी 11 वाजता सचखंड एक्सप्रेस धावत्या रेल्वेसमोर जितेंद्रने दोन्ही चिमुकल्यांना उडी घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती पाचोरा येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक शब्बीर शेख, हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार व प्रवीण वाघ यांनी पंचनामा केला. याप्रकरणी रेल्वे पोलिसात अत्महत्येचे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे बोरखेडा गावी मोठी शोककळा पसरली.