आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी ; एकावर मुंबईत उपचार
यावल- तालुक्यातील बोरावल गावात एकाच कुटुंबातील चार लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून यातील एका रुग्णाला मुंबई येथे तत्काळ हलवण्यात आले आहे. दरम्यान, बोरावल गावात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
एकाच कुटुंबातील चौघांना स्वाईन फ्लू
आरोग्य विभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहितीनुसार, यावल तालुक्यातील बोरावल या 600 लोकवस्तीच्या गावातील दीपाली अमोल पाटील (26) या महिलेला गेल्या तीन दिवसांपासून हिवताप असल्याने आरोग्य विभागाने गावात धाव घेत गावातील प्रत्येक कुटुंबांची आरोग्य तपासणी केली. या आरोग्य तपासणीत अमोल दिनेशसिंग पाटील (36), भूमी अमोल पाटील (5), व अमोल पाटील यांच्या आई रंजना दिनेशसिंग पाटील (55) आणि दवाखान्यात उपचार घेत असलेल्या दीपाली अमोल पाटील (26) वर्ष या एकाच कुटुंबातील सर्वांना स्वाईन फ्लू ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दीपाली पाटील यांना जळगावच्या ओम क्रिटीकल येथे दाखल केले असता त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तत्काळ मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लू गंभीर आजाराचा प्रसार होवु नये या करीता खबरदारीचे उपाय म्हणून हिवतापाचे व सतत खोकला येणार्या नागरीकांनी तोंडाला रुमाल लावून वावरावे तसेच लक्षणे आढळल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गावातील प्रत्येक घरात औषधी वाटण्यात आल्याची माहिती साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी दिली. दरम्यान, गावातील परीस्थितीवर आरोग्य सहाय्यक पी.पी.ढाके, एस.बी.पारधी, सल्लाउद्दीन शेख, के.पी.तायडे लक्ष ठेवून आहेत.