अमळनेर । शहरातील बोरी नदी पात्रात घाणीचे साम्राज्य वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाकडून नदीतील घाण काढण्याच्या दृष्टीने कोणतीही पाऊले उचलली जात नसल्याने नागरिकांतून नाराजीचा सुर निघत आहे. दरम्यान या घाणीमुळे पावसाळ्यामध्ये नदी शेजारील घरामध्ये पाणी जाण्याचे प्रकार झालेले आहेत. सखाराम महाराजांचे मंदिरही ह्याच नदी पात्रात असल्यामुळे दररोज त्याठिकाणी भाविक येत असतात त्यानाही घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे.
साचलेल्या कचर्यामुळे नागरीकांचे आरोग्य आले धोक्यात
जमा झालेल्या व साचलेल्या कचर्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि घाणीने ही नदी व्यापून गेली आहे. या बाबीचा सर्वाधिक त्रास या नदीच्या कडेला राहणार्या नागरिकांना करावा लागत आहे. या नदीमधील दुर्गंधी आणि घाणीच्या विळख्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पावसाळ्यात तर नदी काठी राहणार्या लोकांना तर एक प्रकारची धास्ती लागून राहिलेली असते. केंव्हा मोठा पाऊस होईल आणि केंव्हा घरांमध्ये पाणी येईल हे सांगता येत नसल्याने नदीकाठी राहणारे लोक धास्तावलेले असतात. आज सर्वत्र स्वच्छता अभियान राबवले जात आहे. सर्वत्र स्वच्छतेला महत्व दिले जात आहे. अशा वेळी बोरी काठावरील नगारिकांना अस्वच्छतेमुळे विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे.
सांडपाण्याचा निचरा होत नाही
या नदीमध्ये सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बराचसा कचरा नदी पात्रात साचल्यामुळे नदी आहे की एखादा नाला असे चित्र दिसून येते. शहरातील अनेक नाल्याचे पाणी या नदीत काढून देण्यात आले आहे. घाणीमुळे हे पाणी पुढे वाहत नाही. ते तेथेच साठून वाहते. यामुळे या ठिकाणी दुर्गंधी, मच्छर तयार झालेले आहेत. या ठिकाणी गवत, बेशरमाची झाडे, मोठी झाडे, लहान झाडे वाढलेली आहेत. नदीमध्ये पावसाळ्यामध्ये दुरवरुन वाहत आलेला कचरा देखील मोठ्या प्रमाणात असून पाण्याची नीट निचरा होत दिसत नाही.