त्रिवेणीनगरातील घटना : चोरटा सीसीटीव्हीत कैद
पिंपरी-चिंचवड : सोन्याच्या दुकानातील महिलेला बोलण्यामध्ये गुंतवून ठेऊन दीड लाखांचे सोने लंपास करण्यात आले. हा प्रकार त्रिवेणीनगर तळवडे येथे नोव्हेंबर 2017 मध्ये घडला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नुकतेच हाती आले असून कॅमेर्यामध्ये चोरटा कैद झाला आहे. अनिल संभाजी बिले (रा. रुपीनगर, तळवडे, भोसरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानात होत्या आजी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिले यांचे त्रिवेणीनगर, तळवडे येथे आयकॉन हॉस्पिटलजवळ तुळजाभवानी ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान आहे. 18 नोव्हेंबर 2017 रोजी बिले यांच्या आई दुकानात होत्या. सकाळी दहाच्या सुमारास एक तरुण दुकानामध्ये आला. त्याने बिले यांच्या आईंना बोलण्यात गुंतवून ठेवले आणि हातचलाखीने एका प्लास्टिकच्या डब्यातील दोन पाऊचमधील 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोने पळविले. दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या आधारे घटनेचे फुटेज तपासले असता चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
असे आहे चोरट्याचे वर्णन
साधारणतः 35 वर्ष वय, अंगाने सडपातळ, रंगाने निमगोरा, उंची 5 फूट 6 इंच, पंधरा शर्ट, पांढरी पॅन्ट, डोक्यात निळी टोपी, काळा चष्मा अशा वर्णनाचा चोरटा आहे. निगडी पोलीस चोराच्या मागावर आहेत.