बोहर्डीच्या शेतकर्‍याची कर्ज डोईजड झाल्याने आत्महत्या

0

भुसावळ : तालुक्यातील बोहर्डी बुद्रुक येथील निलेश भीमसिंग पाटील (36) या शेतकर्‍याने कर्ज डोईजड झाल्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

कर्जाच्या ओझ्यामुळे केली आत्महत्या
बोहर्डी बुद्रुक येथील निलेश भिमसिंग पाटील या शेतकर्‍यावर गेल्या दोन-तीन वर्षापासून सोसायटी व बँकांकडून तसेच हात उसनवारी यातून कर्ज झाले होते वअनेक दिवसापासून कर्जबाजारीपणामुळे शेतकरी त्रस्त झाला होता. 5 मे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नागराणी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बंद पडलेल्या ढाब्याजवळ शेतकर्‍याने विषारी द्रव्य प्राशन केले. नागरीकांनी त्यास वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले. मृत शेतकर्‍याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परीवार आहे. दरम्यान, निलेश यांच्या पत्नी सरपंच असून त्यांच्या आत्महत्येनंतर परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वरणगाव पोलिसात जीवन पाटील यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.