बोेदवड नगराध्यक्षपदी भाजपच्या मुमताजबी बागवान

0

जळगाव : बोदवड शहरात प्रथमच नगर पंचायतची निवडणूक पार पडली होती. या ठिकाणी पहिला नगराध्यक्षपदाचा मान हा भाजपाच्या नगर सेविका मुमताजबी सईद बागवान यांना मिळाला आहे. तर शिवसेनेचे नगरसेवक नितीन चव्हाण यांना उपनगराध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे. हा मतदार संघ आमदार खडसे व खासदार रक्षा खडसे याच्या मतदार संघात येत असल्याने सर्वाचे येथील नगराध्यक्ष पदाकडे लक्ष लागले होते.

येथे प्रथमच नगर पंचायतसाठी मत झाले होते.प्रथम नगरध्यक्ष व उपनगराध्यक्ष कोण बसणार व कोणत्या पक्षाचा झेंड लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. भाजपा व राष्ट्रवादी-कॉग्रेस याच्याकडे बहुमत नसल्याने जोडतोडचे राजकारण सुरू होते.मात्र 23 रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे नगराध्यक्षपदासाठी दीपक झांबड व उपनगराध्यक्ष पदासाठी अपक्ष सदस्या आफरीन बानो बागवान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. हात उंचावून झालेल्या मतदानात अपेक्षेप्रमाणे अध्यक्षपदाच्या उमेदवार मुमताजबी व उपनगाराध्यक्ष नितीन चव्हाण यांना प्रत्येकी 9 मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भुसावळचे उपविभागीय अधिकारी कुमार चिंचकर तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी काम पाहिले. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी त्यांना विजयी घोषीत केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यानंतर विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

भाजपाने सेना व अपक्षाला घेतले सोबत
भाजपकडून मुमताजबी बागवान तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. दिपक झांबड यांनी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मतदान प्रक्रिया हात उंचवून पध्दतीने पार पडली. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मुमताजबी बागवान यांना नऊ मते, अ‍ॅड. दिपक झांबड यांना आठ मते पडली. बोदवड नगरपंचायतीमध्ये भाजपाला बहुमत नव्हते. त्यासाठी भाजपाचे वर्चस्व टिकविण्यासाठी शिवसेनेचे नितीन चव्हाण व अपक्ष मिर्झा अकबर बेग यांना सोबत घेण्यात आले.

कुरघोडीला सुरू लावून शिवसेना-भाजपा युती
निवडणुकीअगोदर शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीअंतर्गत युती होणार असल्याचे वर्तविले जात होते. परंतु शिवसेनेचे नितीन चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. उध्दव पाटील व भाजपाचे दिपक वाणी यांचा पराभव केला होता. पक्षश्रेष्ठींनी भाजपातर्फे नगराध्यक्षपदासाठी मुस्लिम समाजाच्या उमेदवाराचे नाव जाहिर करताच पक्षांतर्गत कुरघोडी सुरु झाली होती. परंतु आमदार एकनाथराव खडसे यांनी सर्वांची कुरघोडी बंद केली. परंतु शिवसेनेचे नगरसेवक शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीसोबत जातील, अशी चर्चा होती. शिवसेना जिल्हाप्रमुखांनी चव्हाण यांना पक्षादेश दिला होता. परंतु त्यांनी हा पक्षादेश झुगारुन भाजपाला मतदान करुन उपनगराध्यक्षपदाची माळ गळ्यात घातली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर होते. सहाय्यक म्हणून नायब तहसिलदार बी.डी. वाडिले तर मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनी सहकार्य केले. मतदान प्रक्रियेनंतर निकाल लागताच बाहेर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.