ब्रम्हकुमारी संघातर्फे भोसरीत व्यसनमुक्ती अभियान

0

राजयोग मेडिटेशनचे लाभ घेण्याचे आवाहन

भोसरी : माणसांना लागलेले कोणतेही व्यसन हे वाईटच असते. अनेकांना दारूचे, जुगाराचे व्यसन असते. नशेमुळे आरोग्याची हानी होते आणि लाखो कुटुंबे बेघर होत आहेत. यावर राजयोग मेडिटेशन हा एक उत्तम उपाय आहे, असे ब्रह्माकुमारी करुणा दीदी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाद्वारे राजयोगाद्वारे व्यसनमुक्ती अभियान या कार्यक्रमाचे भोसरी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार महेश लांडगे, विलास लांडे, नगरसेवक सागर गवळी व विलास मडेगिरी, अनुराधा गोफणे, अजित गव्हाणे, गोपी धावडे, संजय वाबळे, विक्रात लांडे, वसंत लोंढे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, डॉ. भरत सरोदे, ब्रह्मकुमार मुकुल भाई हे उपस्थित होते.

व्यसन वाईटच असते
करुणा दीदी यांनी पुढे सांगितले की, आज सगळीकडे तणाव वाढत चालला आहे. यामुळेच लोक व्यसनांच्या आहारी जात आहेत. परंतु व्यसन हा तणावाचा उपाय नाही. तंबाखूमुळे दरवर्षी 20 लाख लोक मृत्यू पावत आहे. आज राजयोग मेडिटेशनच्या अभ्यासामुळे हजारो लोकांचे जीवन तणावमुक्त व व्यसनमुक्त झाले आहे. आमदार महेश लांडगे यांनी दीप प्रज्वलन करून उपस्थितांना व्यसनमुक्तीचे आवाहन केले. ब्रह्माकुमारीजच्या सदस्यांनी पथनाटय सादर केले. जागतिक तंबाखू निषिद्ध दिनानिमित्त 30 जून पर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होणार असून राजयोग मेडिटेशनचा विनामूल्य लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.