ब्रिटनच्या मॅन्चेस्टरमध्ये दहशतवादी हल्ला

0

लंडन । ब्रिटनमधील मँचेस्टर एरिना येथे सोमवारी रात्री पॉप गायक अरियाना ग्रँडच्या कॉन्सर्टदरम्यान झालेल्या दोन स्फोटात सुमारे 22 जण ठार तर 59 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा दहशतवादी असल्याचे सांगण्यात येते. हा आत्मघातकी हल्ला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी अरियाना गाणे सादर करत होती. गायिका अरियाना सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात ठार झालेल्यांप्रती शोक व्यक्त करत डाऊनिंग स्ट्रीटवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यापर्यंत उतरवण्याच्या सूचना करण्यात आली आहे. 10 डाऊनिंग स्ट्रीट हे ब्रिटिश सरकारचे मुख्यालय आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध केला असून या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमींसाठी मी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

कॉन्सर्टला केले होते टार्गेट
दहशतवाद्यांनी अमेरिकन पॉप सिंगर अरियाना ग्रांडेच्या कॉन्सर्टला टार्गेट केले. या कार्यक्रमाला 10,000 लोक उपस्थित होते. त्यात तरुण-तरुणींची संख्या सर्वाधिक होती. सिंगर ग्रांडे सुरक्षित आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याच दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. दुसरीकडे, पंतप्रधान थेरेसा में यानी इलेक्शन कॅम्पेन थांबवून आपातकालीन बैठक बोलावली होती. नरेंद्र मोदी यांनी मॅनचेस्टर येथील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी ’ट्वीट’ करून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांबाबत संवेदना प्रकट केल्या आहेत.

एका आत्मघातकी हल्लेखोराचा हात
स्फोटोमागे एका आत्मघातकी हल्लेखोराचा हात असल्याची माहिती ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी दिली. पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासानुसार हल्लेखोर एकटाच होता. मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश असल्याचे पोलिसांचे मत आहे. ग्रेटर मँचेस्टरचे पोलीस प्रमुख इयान हापकिन्स यांनी या हल्ल्यामागे आत्मघातकी हल्लेखोराचा हात असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. हल्लेखोर एकटा होता किंवा यामध्ये एखाद्या मोठ्या नेटवर्कचा समावेश होता.

अरियानाचा मन हेलावणारा मेसेज!
पॉप सिंगर अरियाना ग्रांडे सुरक्षित असली तरी ती कोलमडली आहे. ज्यावेळी स्फोट झाला, तेव्हा अरियानाचा परफॉर्मन्स सुरु होता. आपल्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर दु:खी अरियानाने आज सकाळी (मंगळवार) ट्वीट करुन लोकांची माफी मागितली आहे. अगदीच कोलमडले आहे. मी यासाठी मनापासून माफी मागते, माझ्याकडे शब्द नाहीत, असे ट्वीट तिने केले आहे.