ब्रिटिशकालीन डेक्कन क्वीनचे इंजिन वस्तुसंग्रहालयात

0

मुंबई । मध्य रेल्वेमार्गावर धावणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ही अतिशय प्रतिष्ठित आणि ब्रिटिश राजवटीतील एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाते. या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला जोडले गेलेले ऐतिहासिक इंजिन सीएसएमटी येथील नव्या छोटेखानी वस्तुसंग्रहालयात लवकरच मुंबईकरांना आणि पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 18 जवळील मोकळ्या जागेत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वस्तुसंग्रहालय स्थापन केले जाणार आहे. त्यात मध्य रेल्वेवरील वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेल्या पुरातन वस्तूंचा समावेश राहणार आहे. त्यात ब्रिटिश जमान्यातील क्रेन, बेल, घड्याळे, दगड फोडणारे यंत्र, पाऊस मोजणारे मापक अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आहे.

1980 पर्यंत हे इंजिन यार्डामध्ये वापरण्यात येत होते
सीएसएमटीजवळील 18 क्रमांकाकडील जागेत छोटेखानी वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयात लेस्ले विल्सन ईएफ1 श्रेणीच्या लोको इंजिनाचा समावेश आहे. या इंजिनासोबत दगड फोडणारे यंत्र, पाऊस मोजणारे मापक, दोन घड्याळे, बांधकामावेळी आढळलेली जुनी हत्यारे, खुर्ची आदींचा समावेश असणार आहे. त्यासाठी या जागेचे सौंदर्यीकरण केले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वस्तूसंग्रहालयात अन्य वस्तूही ठेवणार
20 व्या शतकाच्या प्रारंभी वापरण्यात येणार्‍या लोको इंजिनासह काही अजस्र गोष्टीही रेल्वेने जपून ठेवल्या आहेत. इतिहासाची नव्याने ओळख देणार्‍या या गोष्टींची मुंबईकरांना, इतिहासाची आवड असणार्‍यांना, अभ्यासकांना उपलब्ध करण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन योजना आखली आहे. त्यातून रेल्वेशी संबंधित खजिना पाहायला मिळेल.