शिरपूर। या देशात इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले त्यांनीदेखील या देशाला जेवढे लुटले नाही त्यापेक्षा जास्त गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने लुटले आहे. याची कबुली स्वत: राजीव गांधी यांनी दिली होती. सरकार हे शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक तर आहेच पंरतू शेतकरी हा कर्जमुक्त कसा होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन देशाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी रविवार 11 रोजी शिरपूर येथे स्वा.सै.शंकर माळी मंगल कार्यालयात सबका साथ सबका विकास या संमेलनाच्या उदघाटन प्रंसगी केले.
मनमान-इंदोर रेल्वे मार्गाचा प्रश्न सुटला
मनमाड-इंदोर रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या 40 वर्षापासुन प्रलंबित होता. त्यास मोदी सरकारने गेल्यावर्षी मंजूरी दिली. त्यासाठी 10 हजार कोटींची तरतुद करण्यात आली असून लवकरच भुमिपूजन केले जाईल. या रेल्वेमार्गामुळे शिरपूर सेंट्रल हब सीटी बनेल. जेणेकरून वेगवेगळे उद्योग येथे उभे राहतील. पर्यायाने बेरोजगांरांची समस्या सुटेल. जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न व शेतीसाठी लागणार्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून विविध माध्यमातून निधी उपलब्ध केला जात आहे. जिल्ह्यात दिल्ली कॉरोड्रॉरच्या माध्यमातून येत्या काही वर्षात विविध उद्योग व्यवसाय येवून जिल्ह्याचे चित्र पलटेल.
शेतकर्याच्या सक्षमतेसाठी त्रिसुत्री
डॉ.भामरे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात दररोज घोटाळ्यांची मालिका सुरू राहत होती. त्यांच्या भ्रष्ट्राचाराचे आकडेदेखील अंचबित करणारे होते. त्यातच देशातील जनतेला नरेंद्र मोदींच्या रूपाने आशेचा किरण लाभला. पारदर्शक सरकार देणार अशी घोषणा करत त्यांनी विकास कामांचा धडाका लावला. गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून विविध योजनांसह ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी 14 व्या वित्त आयोगात 80 लाखापेक्षा जास्त निधि ग्रामपंचायत खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला. शासन शेतकर्यांना कर्जमाफी तर देणारच आहे,मात्र शेतकर्याला सक्षम उभे करण्यासाठी शेतीला पाणी मुबलक,वीज व शेतमालाला रास्त भाव हे त्रिसुत्री काम हाती घेतले आहे. यामुळे शेतकरी हा कर्जमुक्त होण्यास मदत होणार आहे. राज्यभर शेतकर्यांनी सुरू केलेल्या संपात काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतलेल्या भुमिकेबाबत टिका केली. येत्या 2019 मध्ये होणार्या विधानसभा निवडणूकीत डॉ.जितेंद्र ठाकूर हेच भाजपाचे उमेदवार राहतील असा स्पष्ट संकेत ना.डॉ.भामरे यांनी यावेळी दिला.आगामी विधानसभा निवडीसाठी आमदार म्हणून डॉ.जितेंद्र ठाकूर यांचे नाव घेतल्यावर अनेकांनी टाळ्यांचा
गजर केला.
यांची होती उपस्थिती
राज्याचे पर्यटन विकास व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या संमेलनात खासदार हिना गावित,भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी,भाजपा उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर,पणन महामंडळाचे संचालक नारायण पाटील,किशोर संगवी,कामराज निकम,भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी,किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे,नगरसेवक मोहन पाटील, तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र ठाकूर, शहराध्यक्ष हेमंत पाटील,चंद्रकला सिसोदिया, संजीवनी सिसोदिया, मनोहर भदाणे, राम भदाणे आदि उपस्थित होते.