पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या ’ब’ प्रभाग कार्यालयासाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. ठेकेदार एवायजी रियॅलीटी यांना हे काम देण्यात आले असून त्यासाठी येणार्या 22 कोटी रूपये खर्चाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली. निविदा दर 21 कोटी 36 लाख अपेक्षित होता. चार निविदांपैकी एवायजी रिअॅलीटी प्रायव्हेट कंपनीने निविदा दरापेक्षा 2.99 टक्के जास्त म्हणजेच 22 कोटी रूपये दर सादर केला. स्थायी समिती सभेपुढे हा विषय ठेवला असता 30 मे 2018 रोजी दप्तरी दाखल करून फेरनिविदा काढण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला होता.
फेरनिविदेचा निर्णय
त्यानंतर महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार, हा विषय तीन महिन्यानंतर स्थायी समितीपुढे फेरविचारार्थ सादर करण्यात आला. तथापि, या दराची स्विकृत योग्य दराशी तुलना करता 2.83 टक्के कमी दर येत आहे. हे काम इमारतीचे आणि विशेष स्वरूपाचे असल्याने फेरनिविदा मागविल्यास दर कमी येण्याबाबत सांशकता आहे. फेरनिविदेमध्ये जादा दर आल्यास निविदा स्विकृती करता येणार नाही. तसेच याबाबत लेखापरिक्षणात आक्षेप येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठेकेदार एवायजी रियॅलीटी यांची 22 कोटी रूपये दराची निविदा स्वीकारण्यात येणार आहे.