जळगाव। महानगरपालिकेच्या आव्हाने शिवारातील हंजीर बायोटिक खत कारखान्याच्या परिसरातून 23 मे 2015 रोजी भंगार चोरीचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला आठ जणांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा खटला न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात सुरू होता. त्यात मंगळवारी आठ जणांना कोर्ट उर्ठपर्यंत शिक्षा तसेच प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद शिक्षा सुनावली आहे.
मनपा कर्मचार्यांला पाहताच रिक्षा सोडून पळाले….
महानगरपालिकेच्या हंजीर बायोटिक खत कारखाना येथे 23 मे 2015 रोजी धमेंद्र घिसाडी तसेच मिराबाई बाबुलाल रखमे, संगिता काशिनाथ बन्सी, भारती नंदू रखमे, माया किसन अहिरे, प्रमिला संजय जाधव, अनुसया हिरामण बन्सी, सिताबाई रमन बन्सी हे आठ जण रिक्षा (क्रं.एमएच.19.3121) ने आले. त्यांनी परिसरात लोखंडी भंगार उचलून रिक्षात भरला मात्र, कारखान्यातील वाहन नोंदणी कर्मचारी रमेश वामन कांबळे यांच्या लक्षात प्रकार लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, कर्मचारी येत असल्याचे समजताच या आठ जणांनी भंगार साहित्य व रिक्षा तेथेच सोडून पळ काढला होता. याप्रकरणी वाहन नोंदणी कर्मचारी रमेश कांबळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात खटला सुरू झाला होता.
पाच साक्षीदार तपासले
यानंतर न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात खटला सुरू झाला. सरकारपक्षातर्फे अॅड. आशा शर्मा यांनी याप्रकरणी पाच साक्षीदार तपासले. यानंतर आज मंगळवारी याप्रकरणी न्या. पाटील यांनी या आठही आरोपींना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. यासोबतच प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड व दंड भरल्यास तीन महिन्यांची साधी कैदेची शिक्षाही सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.