भंगार जाळणार्‍यांवर कडक कारवाई करावी 

0
परिसरातील नागरिकांकडून होते मागणी
चिंचवड : चिंचवडच्या ऑटो कल्स्टर समोरील मैदानात भंगार व्यावसायिकांकडून रबर, प्लास्टिकचा भंगार माल जाळण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात काळ्याकुट्ट धुराचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून अशा भंगार व्यावसायिकांवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सामाजिक संस्था झटत असताना दुसरीकडे काही भंगार व्यावसायिक आपल्याकडील रबर, प्लास्टिक जाळून प्रदूषणात भर टाकत असल्याचे चित्र दिसत आहे. चिंचवडच्या ऑटो कल्स्टर समोरील मैदानात भंगार व्यावसायिकांकडून रबर, प्लास्टिकचा भंगार माल जाळण्यात येत आहे.
  
मध्यरात्री पुन्हा भंगार जाळले
याबाबतची माहिती एका जागरूक नागरिकाने मंगळवारी रात्री अग्निशमन दलाला दिल्यानंतर त्वरित त्या ठिकाणची आग अग्निशामक दलाकडून विझवण्यात आली. मात्र मध्यरात्री पुन्हा त्या ठिकाणी भंगार साहित्य पेटवण्यात आले. याबाबतची माहिती संबंधित नागरिकाने पोलीस आयुक्तालयाच्या ‘फोन अ फ्रेंड’ नंबरवर कळविण्याची प्रयत्न केला, परंतु पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाही. या ठिकाणी एक संशयित कारदेखील आढळून आली, अशी माहिती संबंधित नागरिकाने पोलिसांना दिली. वारंवार पेटवून देण्यात येणार्‍या भंगार साहित्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा भंगार व्यावसायिकांवर संबंधित विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे तुषार शिंदे यांनी केली आहे.