भंगाळे गोल्डच्या कारागिराकडून 14 लाखांची फसवणूक

जळगाव : बंगाली कारागीराने चार वर्ष काम करीत मालकाचा विश्वास संपादन करून तब्बल 14 लाख 11 हजार 649 रुपये किंमतीचे सोने घेवून पळ काढल्याची घटना जळगावात भंगाळे गोल्डमध्ये घडली. याबाबत संशयीत अस्ता तारक रॉय (मातोश्री बिल्डींग शनीपेठ, जळगाव, मूळ रा.पश्चिम बंगाल) असे फसवणूक करणार्‍या कारागीराचे नाव असून त्याच्याविरोधात शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

विश्वास संपादन करीत लांबवले सोने
शहरातील राजकमल टॉकीजसमोर भंगाळे गोल्ड नावाचे सुवर्ण पेढी आहे. या सुवर्णपेढीसाठी अस्ता तारक रॉय हा दागिने तयार करीत होता. गेल्या चार वर्षांपासून काम करत असल्याने भंगाळे गोल्डचे मालक यांचा विश्वास बसला होता. याचा गैरफायदा घेवून वेळोवेळी 24 कॅरेट सोने वेगवेगळ्या वजनाचे सोन्याचे तुकडे घेवून जावून त्यातील काही सोन्याचे दागिने रॉय याने भंगाळे गोल्ड येथे जमा केले होते तर यातील काही दागिने रीपेअरींग करायचे देखील होते. यातील उर्वरीत 14 लाख 11 हजार 649 रुपये किंमतीचे 273.269 ग्रॅमचे वजनाचे सोने घेवून भंगाळे गोल्ड यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आकाश भागवत भंगाळे यांनी शनीपेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर आरोपी अस्ता तारक रॉय (मातोश्री बिल्डींग शनीपेठ, जळगाव, मूळ रा.पश्चिम बंगाल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.