अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक आरोप
मुंबई : कोरेगाव भीमामध्ये यावर्षीही लोक मोठ्या संख्येने जमतील. त्यामुळे सरकारने मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत स्थानबद्ध करावे. तसेच सरकारने कडक सुरक्षा ठेवावी, असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तसेच भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे.
भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत तुमसर, भंडारा, साखोली, अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया या मतदान केंद्रावर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 38.65 टक्के मतदान झाले होते. मात्र, त्यानंतर एका तासात 53.15 टक्के मतदान झाल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. शेवटच्या तासात 14.50 टक्के फरक कसा पडला, असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. एका पोलिंग स्टेशनवर 1200 मतदान होते. त्यात एका तासात 101 मतदान करता येऊ शकते. मात्र, भंडारा निवडणुकीत 180 मतदान कसे झाले, शेवटच्या तासात मतदार आले नाहीत मग निवडणूक अधिकारी बटन दाबत होते का? असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे.
संभाजी भिडे व मिलिंद एकबोटेंना स्थानबद्ध करा
पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये यावर्षीही लोक मोठ्या प्रमाणात जातील. सरकाराने त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. लोकांच्या सुरक्षेसाठी येत्या 30 डिसेंबरपासून 2 जानेवारीपर्यंत संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे व त्यांच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करावे अशी मागणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
पृथ्वीराज चव्हाणांचा बदनामीचा गेम
काँग्रेस आणि भारिप आघाडीबाबत पृथ्वीराज चव्हाण बदनामीचा खेळ खेळत आहेत. आतापर्यंत आमच्या 4 बैठका झाल्या त्यामधून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे आंबेडकर म्हणाले. अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांनी वरून आदेश आले की नाही ते लवकर सांगावे, असे आवाहन त्यांनी केले. आम्ही काँग्रेसचे उमेदवार ज्या ठिकाणी पडतात त्या 12 जागा मागितल्या आहेत, पण काँग्रेसने अद्याप त्यांचा प्रस्ताव दिलेला नाही. आमची जूनपासून स्वबळाची तयारी पूर्ण झाली असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.