भगवान गौतम बुध्द आणि डॉ. आंबेडकरांची संयुक्त जयंती

0

मुंबई – तथागत भगवान गौतम बुध्दांची 2579 वी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती येत्या 10 मे रोजी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे संयुक्तरित्या साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विश्वशांती परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमात जागतिक किर्तीचे विचारवंत, बौध्द तत्त्वज्ञानी तसेच मोठ्या प्रमाणावर भंतेगण उपस्थित रहाणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी गुरूवारी सांगितले.

या संयुक्त जयंती दिनानिमित्त चीन, जापान, म्यानमार, श्रीलंका, व थायलंड तसेच इतर देशांचे भारतातील राजदूत सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वशांती परिषदेचे प्रमुख पाहुणे असतील. सदर कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्य मंत्री किरण रिजिजू, सांस्कृतिक मंत्री विनोद  तावडे, पालकमंत्री सुभाष देसाई, सामाजिक  न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विश्वशांती परिषदेत विविध वैचारिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी काळाघोडा ते गेट वे ऑफ इंडिया अशी भव्य शांतता रॅली काढण्यात येईल, असेही बडोले म्हणाले.

काळाघोडा ते गेट वे ऑफ इंडिया ही शांतता रॅलीसुध्दा वैशिष्ट्यपूर्ण काढण्यात येईल. डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर समतेसाठी संघर्ष केला तर तथागतांनी विश्वाला शांतीचा संदेश दिला. या दोन तत्त्वांना अनुसरून शासनाने विश्वशांती परिषद आयोजित केली आहे. या परिषदेतून एकूणच विश्वातील मानवाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तसेच शांतीचा संदेश देण्यात येईल. आज विश्वाला अहिंसा, शांतीची सर्वाधिक गरज असून मानवी प्रगतीसाठी जगाने तथागत भगवान गौतम बुध्दांच्या मार्गाने जाण्याची आवश्यकता असल्याचेही बडोले यावेळी म्हणाले.

सायंकाळी साडेपाच वाजता काळाघोडा येथून भव्य रॅली निघणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी गेट वे ऑफ इंडिया येथे रॅली पोहोचल्यानंतर साडेसहा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने बौध्द भिख्खूगण, विचारवंत, बौध्द राष्ट्रांचे भारतातील राजदूत वैचारिक मांडणी करतील.

आजवर या दोन महामानवांची संयुक्त जयंती साजरी करण्याची प्रथा नाही. इतर बौध्द राष्ट्रांत साजऱ्या केल्या जाणाऱ्या जयंतीप्रमाणे आपलीही जयंती शिस्तीत आणि उत्साहात साजरी झाली पाहिजे. दहा मे रोजी सायंकाळी होणाऱ्या शांतता रॅलीत सहभागी होतांना सहकुटूंब श्वेत वस्त्र परिधान करून शिस्तीत रांगेने सहभागी व्हावे.  कुठेही घोषणाबाजी, आरडाओरडा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.