भगवान नेमीनाथ वार्षिक महामस्तकाभिषेक व रथोत्सव सोहळा

0

नशिराबाद येथे मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव- नशिराबाद येथील मुलनायक श्री 1008 भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट आयोजित भगवान नेमीनाथ वार्षिक महामस्तकाभिषेक व रथोत्सव सोहळा मंगळवार, 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. सन 1935 पासून अखंडपणे सुरू असलेला हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी खान्देशासह मध्यप्रदेश, विदर्भ, मरावाड्यातील जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. खान्देशातील पुरातन, अतिशय क्षेत्र असलेल्या मंदिरात जैन समाजाचे प्रथम तिर्थंकर भगवान आदिनाथ यांची प्राचीन मूर्ती विराजमान आहे. गेल्या दोन वर्षांपासून महामुनी आचार्य 108 विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य 108 अक्षयसागर महाराज व नेमिसागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराच्या जीर्णोद्वाराचे कार्य सुरू आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम लाल दगडात करण्यात येत आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
25 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता अभिषेक व आरती, नऊ वाजता कलशयात्रा व रथोत्सव, दुपारी 12 वाजता महाप्रसाद, दुपारी 2 ते 5 दरम्यान ध्वजारोहण, मंडपशुध्दी व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

पुरातन जैन मंदिर
नशिराबाद येथील जैन मंदिराची स्थापना 16 मे वीर सवंत 1916, वैशाख शुक्ल षष्टीला झाली. मंदिरातील वेदीवर मुलनायक श्री 1008 भगवान आदिनाथ समवेत भगवान पार्श्वनाथ, मुनिसुप्रतनाथ, चंद्रप्रभू भगवान बाहुबलींसह 14 तीर्थंकरांच्या मूर्ती विधीवत विराजमान आहेत.

रथोत्सवाची परंपरा
भगवान नेमिनाथांचा या रथावर लावलेल्या ताम्रपटानुसार सन 1935-36 मध्ये रथाची बांधणी श्रावक श्रेष्ठी पितांबर देवराम साखरे यांनी केली असून त्यासाठी दगडू व सोनू पांचाळ (सुतार) यांनी रथ निर्मितीसाठी सहकार्य केले आहे. त्याच वर्षापासून हा रथोत्सव सुरू झाला आहे. रथाला प्रथम मोगरी लावण्याचा मान झिपरु मिस्त्री यांना मिळाला असून पुढे त्यांचे वंशज एकनाथ झिपरु मिस्त्री त्यानंतर प्रशांत एकनाथ मिस्त्री यांनी ही परंपरा सुरू ठेवली होती.

दानशूरांची मांदीयाळी
157 वर्षाच्या प्राचीन जीन मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी देशभरातील जैन समाजातील दाते मदतीला येत असून एकप्रकारे या जिर्णोध्दारासाठी दानशुरांची मांदीयाळी जमत असल्याचे दिसून येत आहे. अतिशय शिस्तबध्द असलेला रथोत्सव सोहळ्याच्या दर्शनाचा लाभ समाज बांधवानी घ्यावा, असे आवाहन मंदिराचे ट्रस्टी, पंच मंडळ, सम्यकवर्धिनी महिला मंडळ, जिर्णोध्दाराचे मार्गदर्शक प्रवीणकुमार जैन (मलकापूर), दिनेश वसंतराव जैन, मंगेश अरुण जैन, महावीर मधुकर जैन, प्रकाश नारायण जैन, विजय कृष्णा जैन, राजेंद्र मधुकर जैन, वर्धमान माधव जैन, महेश ईश्वरलाल जैन, भुषण शरद जैन व नशिराबाद ग्रामस्थांनी केले आहे.