भगवान परशुराम जयंतीनिमित्त लावलेले शुभेच्छांचे बॅनर फाडले!

0

जळगाव। भगवान परशुराम जयंतीनिमित्त शहरात विविध चौकात शुभेच्छा बॅनर लावण्यात आली आहेत. महाबळ चौकात लावण्यात आलेल्या तीन बॅनर फाडल्याचा प्रकार बुधवारी रात्री गस्तीवर असलेल्या पोलीसांनी बघीतला. नंतर ही बाब भगवान परशुराम सेवा समितीच्या पदाधिकार्‍यांना कळविण्यात आली. सकाळी समाजबांधवांनी या घटनेबददल निषेध करून याप्रकरणी दोषीवर कारवाई करण्यात यावी, यामागणीसाठी रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक प्रविण वाडिले यांच्याजवळ कैफियत मांडली.

भगवान परशुराम जयंती दरवर्षी भगवान परशुराम सेवासमितीतर्फे साजरी कली जाते. यात बहुभाषिक समाजबांधव मोठया संख्येने सामील होतात. यानिमित्त शहरात जयंतीच्या पार्श्वभूमीवर मनपाची परवानगी घेझून शुभेच्छा पोस्टर लावली जातात.यासाठी मनपाची परवानगी घेतली जाते. महाबळ चौकात खा.ए.टी.पाटील तसेच अन्य दोन अशी तीन पोस्टर महाबळ चौकात नगरसेवक नितीन बर्डे यांच्या निवासस्थानासमोर सार्वजनिक जागी लावण्यात आली होती. बुधवारी रात्री पोलीस गस्ती करत असताना पोस्टर फाडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याची गंभीर दखल घेत पोलीसांनी भगवान परशुराम सेवासमितीच्या महाबळ कॉलनीतील पदाधिकार्‍यांनी घटनेची माहिती दिली. बहुभाषिक ब्राम्हण महासंघ व इतर सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन याप्रकरणी चर्चा केली. नंतर गुरूवारी रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठून हा प्रकार पो.नि. वाडीले यांच्या लक्षात आणून दिला. कोणीतरी अज्ञाताने हेतू पुरस्काराने पोस्टर फाडून समाजाच्या भावना दुखावण्याचे कृत्य केले. याप्रकरणी संबधितावर गुन्हा दाखल करून त्यास त्वरीत अटक करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी केली. निरीक्षक वाडीले यांच्या कॅबीनमध्ये पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

तेढ निर्माण करण्यासाठी कृत्य
भुपेष कुळकर्णी (32) देवेंद्रनगर सत्यम अपार्टमेंट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनग पोलीस ठाण्यात भादवी कलम 427 प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तेढ निर्माण करण्याच्या उददेशाने कृत्य केल्याचे या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. यावेळी पोलीस ठाण्यात श्रीकांत खटोड, समाजनेते नितीन कुळकर्णी, प्रविण कुळकर्णी, भूपेश कुळकर्णी, निलेश कुळकर्णी, अशोक जोशी, राजेश नाईक, भूषण मुळे, तेजस जोशी, अरूण जोशी, किरण कुळकर्णी यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. संतप्त समाजबांधवांच्या भावाना ऐकूण घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रविण वाडिले म्हणाले, तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल करू याप्रकरणी तपासाला गती दिली जाईल. ज्या कोणी संशयीताने हेतुपुरस्कार हे कृत्य केले असेल, त्याचा शोध घेतला जाईल, याकामी आपलेदेखील सहकार्य घेतले जाईल.