धुळे: राईनपाडा घटनेची सखोल चौकशी करून प्रत्येक दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल. भटके विमुक्तांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
राईनपाडा, ता.साक्री, जि. धुळे येथे ग्रामस्थांच्या मारहाणीत रविवारी पाच जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आज रोहयो मंत्री रावल, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राईनपाडा येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डी. एस. अहिरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार प्रा. शरद पाटील आदी उपस्थित होते.
रोहयो मंत्री रावल यांनी सांगितले, घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. या घटनेतील दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येईल. या घटनेतील मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
राईनपाडा घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार : गृह राज्यमंत्री दीपक केसरकर
गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले, या घटनेची पोलिस सखोल चौकशी करतील. या घटनेतील प्रत्येक दोषी व्यक्ती वर कारवाई करण्यात येईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. या घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदारांना पोलिस संरक्षण देण्यात येईल. तसेच या परिसरात पोलिस दूरक्षेत्र निर्मितीसाठी पोलिस अधीक्षक यांनी प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी नमूद केले. नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या माहितीची खात्री करावी. त्यांनतरच ती माहिती पुढे पाठवावी. अफवा रोखण्यासाठी सायबर कायद्यात सुधारणा करण्यात येतील.